पार्थ पवारांच्या पराभवामुळे पवार घराण्याची ५० वर्षाची विजयाची परंपरा ‘खंडीत’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पवार कुटुंबीयांसाठी प्रतिष्ठेची ठरलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत पार्थ पवार यांचा जवळपास दोन लाखांच्या मताधिक्याने पराभव झाला. पार्थ पवार यांच्या पराभवामुळे पवार घराण्यात असलेली ५० वर्षांची विजयाची परंपरा खंडीत झाली आहे. पवार कुटुंबीयांनी गेल्या ५० वर्षातील पत्येक निवडणुकीत विजय मिळवला होता. मात्र, ही परंपरा आज पार्थच्या रुपाने खंडीत झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी माढा मतदारसंघातून माघार घेऊन नातू पार्थ पवार याला मावळमधून उमेदवारी दिली. राज्यात शरद पवार यांचा दबदबा आहे तर मावळ लोकसभा मतदार संघात अजित पवार यांचा दबदबा आहे. मात्र असे असतानाही पार्थ पवार यांना विजय मिळाला नाही. पार्थ पवार यांच्या पराभवामुळे शरद पवार आणि अजित पवार यांना मोठा धक्का मानला जात आहे.

राज्याच्या राजकारणात आणि देशाच्या राजकारणात शरद पवार यांच्यासारखा हुशार नेता नाही. शरद पवारांनी आपल्या ५० वर्षाच्या कारकीर्दीमध्ये पराभव कधी पाहिला नाही. मात्र नातवाच्या पराभवामुळे शरद पवार यांचे राजकीय वजन कमी झाले की काय असा प्रश्न कार्य़कर्त्यांना पडू लागला आहे. पार्थ पवार यांचा पराभव म्हणजे शरद पवारांचा पराभव झाला असल्याचे मानले जात आहे.

राज्यात राष्ट्रवादीची बिकट अवस्था झाली आहे. पार्थ पवार यांना उमेदवारी दिल्याने मावळ लोकसभा मतदारसंघ प्रतिष्ठेचा बनला होता. पार्थ पवार यांना निवडून आणण्यासाठी अजित पवार यांनी मावळात तळ ठोकला होता. तर शरद पवार यांनी पक्षापासून दूर गेलेल्या नेत्यांच्या भेटी घेऊन पार्थला निवडणून आण्याचे आवाहन केले होते. मात्र शरद पवारांच्या आवाहनाला फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

हा पराभव पार्थ पवारचा नसून अजित पवार यांच्या राजकारणाचा असल्याचे मत विजयी उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांनी व्यक्त केले आहे.