महाराष्ट्रात काँग्रेसला ‘मतभेद की मनभेदा’चा फटका ?

पुणे : पोलीसनामा [विश्लेषण]- यंदा २०१९च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप आणि मित्रपक्षांनी यशस्वी कामगिरी करीत पुन्हा सत्तेची सूत्रे काबीज केली आहेत. महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचे झाल्यास काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडीला अपेक्षित यश संपादन करता आलेले नाही. उलट आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सत्तेचा सारीपाट काबीज करण्याचे मनसुबे ‘पाण्या’त गेले आहेत. त्यात काँग्रेसची अवस्था ‘ना घरका ना घटका ‘ अशी झाली आहे; पण महाराष्ट्रात नेमकी ही स्थिती का ओढवली ? याच विषयावर काँग्रेसच्या गोटात चर्चेचे गुऱ्हाळ रंगले आहे आणि एकमेकांवर खापर फोडण्याचे राजकारण आता आणखी पेटणार आहे. वास्तविक ‘मतभेद कि मनभेद ‘ या प्रश्नात गुरफटलेल्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापूर्वीची व्युहरचना आणि त्याआधी काढलेल्या संघर्ष यात्रेने काय साध्य केले हा प्रश्न जितका महत्वाचा आहे, त्याहीपेक्षा मूठभर नेत्यांच्या मनमानी कारभारामुळे ही वेळ ओढवली आहे का ? यावर आता आत्मचिंतनापेक्षा काथ्याकूट होणार आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी नांदेड येथील इंदिरा गांधी मैदानावर महाआघाडीची पहिली संयुक्त प्रचार सभा दणक्यात झाली होती; पण त्यावेळी राज्यात काँग्रेस सध्या काय करतेय ? हाच प्रश्न काँग्रेसच्या गोटात चिंतेचा ठरला होता. नांदेडमधील महाआघाडीच्या विराट प्रचारसभेकडे काँग्रेसमधील जे काही मूठभर नेते आहेत, त्यांनीच पाठ फिरवल्याने काँग्रेसमध्ये मतभेद आहेत कि मनभेद ? हाच प्रश्न त्यावेळी चव्हाट्यावर आला होता. या संयुक्त प्रचारसभेत भाजपसरकारवर टीकेची तोफ डागण्यात आली. मुख्यत्वे राफेल या मुद्द्यासह नोटबंदी, दहशतवादी हल्ले, साखर, गहू ,कापूस निर्यात, शेती अर्थव्यवस्था, शेतीमालाला हमीभाव, रोजगार, काळा पैसा आदी मुद्द्यांना हात घालून यंदा परिवर्तन अटळचा निर्धार म्हणा नारा देण्यात आला. या प्रचाराच्या शुभारंभाला व्यासपीठावर मात्र काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांची अनुपस्थिती पाहता काँग्रेसमध्ये आलबेल नसल्याचेच त्यावेळी स्पष्ट झाले होते. त्यानंतर घडलेले नाट्य सर्वश्रुत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात अस्तित्व गमविण्यासाठी मूठभर नेते कारणीभूत आहेत का ? हा प्रश्न आता महत्वाचा ठरला आहे.

काँग्रेसमध्ये हाताच्या बोटावर मोजण्याइतपत नेत्यांची संख्या सद्यस्थितीत आहे आणि त्यांच्यातच मतभेद आहेत हेही सर्वश्रुत आहे. देशात काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी सत्तासमीकरणासाठी व्यूहरचना आखली होती, मोदी सरकारला खिंडीत गाठत होते. भाजपनेच पूर्वी खेळलेल्या डावपेचाची पुनरावृत्ती करून भाजपची कोंडी करण्यासाठी राहुल गांधी सरसावले होते; पण महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये एकमेकांना खाली खेचण्यासाठी या मूठभर नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरु होती आणि आहे.

समाजवाद आणि सर्वधर्मसमभाव स्वीकारणाऱ्या काँग्रेसने अनेक वर्षे सत्ता भोगली; पण काँग्रेसला सत्तेतून खाली खेचण्यासाठी सारे विरोधक एकवटले होते. तीच स्थिती आता भाजपवर उलटविण्यासाटी मोदी विरोध या एका अजेंड्याखाली अनेक पक्ष एकवटले, प्रियांका गांधी याही राजकारणात सक्रिय झाल्या, ही काँग्रेससाठी जमेची बाजू होती मात्र हायकमांडच्या मर्जीत असलेल्या महाराष्ट्रातील नेत्यांना सत्ता येण्याआधीच आगामी विधानसभा निवडणुक आणि मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न पडले. परिणामी त्यातून मनभेदाचे राजकारण पेटले. त्यामुळेच नांदेडच्या प्रचारसभेकडे राज्यातील दिग्गज नेत्यांनी पाठ फिरवल्याची चर्चा काँग्रेसच्या गोटात होती आणि आता ती या पराभवाला कारणीभूत ठरवली जाणार आहे. त्यातही यापूर्वी काढलेल्या जनसंघर्ष यात्रेवरही पक्षांतर्गत टीकाटिपण्णी होत आहे आणि त्यातील वास्तव काय होते, हेही आता मांडले जात आहे. ते म्हणजे मोदी लाटेत होत्याचं नव्हतं झालेल्या काँग्रेसची अवस्था आता वर्चस्व नाही तर अस्तित्व टिकविण्यासाठी संघर्ष करण्यापर्यंत आली.

विशेषतः महाराष्ट्रात तर काँग्रेसची केविलवाणी अवस्था आहे. जे नेतृत्व करीत आहेत त्यांच्याबद्दल पक्षांतर्गत विरोधाची भावना आहे; पण काय स्वतःचे अस्तित्व टिकविण्यासाठी जो -तो स्वतःपुरते पाहत आहे परिणामी जनतेच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले जात नाही ही वस्तुस्थिती आहे. जनसंघर्ष यात्रेद्वारे जनमानसात गेलेली पत पुन्हा प्राप्त करण्यासाठी काँग्रेसला संघर्ष करावा लागला का ? हा प्रश्न आजही उपस्थित केला जात आहे. या मूठभर नेत्यांच्या आडमुठ्या भूमिकेमुळे अस्तित्व गमवून बसण्याची वेळ आता ओढवली आहे. त्यातही गत वर्षी उन्हाळ्यात एसी गाड्यांच्या ताफ्यातून संघर्ष यात्रा वादग्रस्त ठरली होती त्यामुळे यंदा उन्हाळा टाळून थोड्या फार पावसात काँग्रेसजणीनी संघर्ष केला. भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र आणि महाराष्ट्र सरकारविरोधात वातावरण निर्मिती होती की, सैरभैर आणि गटातटात विखुरलेल्या कार्यकर्त्यांना एकत्र करून त्यांच्यात उत्साह निर्माण करण्यासाठी की आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ‘पेरणी ‘ यासाठी ही जनसंघर्ष यात्रा होती हा प्रश्नही दुर्लक्षून चालणार नाही.

काँग्रेस हा विचार आहे असे मानून आयुष्य वेचणार्‍या अनेक पिढ्य़ांना आणि सध्या काँग्रेससोबत असणार्‍या अनेकांना आजही काँग्रेसबद्दल नितांत आदरच काय अपेक्षा आहेत. जनसंघर्ष यात्रेचे फलित काय ? हा प्रश्न जर पाहिला तर काँग्रेसच्या बहुतांश नेत्यांकडून पाच वर्षे घरी बसायला लागल्याने जे दु:ख वाट्याला आले त्याचीच मळमळ बाहेर पडली असेच म्हणावे लागेल. मुळात जनसंघर्ष यात्रेच्या नियोजनाची जबाबदारी त्या -त्या जिल्ह्याच्या स्थानिक नेत्यांवर सोपवली होती. एकप्रकारे या मॅनेज यात्रेत मानापमानाचे नाट्यही घडले तर काही ठिकाणी दोन गटाच्या वादाची झळ पोहचली. जिथे एका स्थानिक नेत्याच्या मुलाच्या वैयक्तिक भांडणाचा मुद्दा महत्वाचा करून सर्व पदाधिकाऱ्याना आंदोलने करण्याचे फर्मान जर नेतृत्व देत असेल तर पक्ष प्रतिमा कशी काय उंचविणार ? हे एक उदाहरण आहे, अशी राज्यात अनेक उदाहरणे आहेत. त्यात मोदी विरोधात महाआघाडी झाली, त्याच्या पहिल्या प्रचारसभेला काँग्रेसचे राज्यातील सर्वच नेते उपस्थित राहणे आवश्यक होते मग ते का नाही राहिले हाच मुद्दा महाराष्ट्रात काँग्रेसचे अस्तित्व गोत्यात आणण्यास कारणीभूत ठरला आहे. राज्यात काँग्रेसच्या नेत्यांमध्ये मतभेद होते, आताही आहेत आणि यापुढेही राहतील; पण मनभेद असतील तर ते काँग्रेसला मारक ठरणार हे निश्चित आहे, हेच लोकसभा निवडणुकीच्या निकालाने दाखवून दिले आहे आणि आता अस्तित्व राहिले नाही मग येत्या विधानसभा निवडणुकीत विजयाची खात्री काय ? हा प्रश्न आता महत्वाचा ठरला आहे.