पक्षबदलू शत्रुघ्न सिन्हा पटण्यातून ‘खामोश’

पाटणा साहिब : वृत्तसंस्था – पटना मतदारसंघातून भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेले शत्रुघ्न सिन्हा हे देखील पराभवाच्या दाट छायेत आहेत. भाजपचे रविशंकर प्रसाद यांनी तब्बल ९१,८०७ मतांनी आघाडीवर आहेत. शत्रुघ्न सिन्हा यांनी २०१४ मध्ये पाटणा येथूनच भाजपसाठी लोकसभेची जागा जिंकली होती. त्यानंतर मात्र वेळोवेळी त्यांनी पंतप्रधान व भाजपविरोधी भूमिका घेतल्यामुळे त्यांचा भाजपमधून पत्ता कट करण्यात आला. भाजपने शत्रुघ्न सिन्हा यांना पाटणा साहिब मतदारसंघातून उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी पक्षाशी असलेले तीन दशकांचे नाते तोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसने त्यांना पाटणा साहिबमधून उमेदवारी दिली होती.

चित्रपटात विविध भूमिका साकारणारे अभिनेते व काँग्रेसचे नेते शत्रुघ्न सिन्हा राजकारणातही सतत वेगवेगळी भूमिका घेतली होती. सिन्हा यांच्या पत्नी पूनम सिन्हा समजावादी पक्षाकडून लखनौमधून निवडणूक लढवली. लखनौमध्ये एकीकडे पक्ष आणि दुसरीकडे पत्नी अशा द्विधा मनस्थितीत अडकलेल्या शत्रुघ्न यांनी काँग्रेसविरोधी भूमिका घेत पत्नीचा प्रचार करण्याला प्राधान्य दिले होते. त्यामुळे काँग्रेसचे नेते त्यांच्यावर नाराज होते. तसेच त्यांनी पाकिस्तानचे निर्माते मोहम्मद अली जीना यांची स्तुती करून नवीन वाद ओढवून घेला होता.