भाजपचे राज्यातील ‘हे’ तीनही केंद्रीय मंत्री आघाडीवर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – देशभरात आज निकलाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनेक माध्यमांनी एक्झिट पोल नुसार भाजपकडे कल दाखवण्यात आला होता. महाराष्ट्रात भाजपचे तिनही मंत्री त्या-त्या मतदार संघात आघाडीवर असल्याचे पहायला मिळत आहे. सकाळपासून जसजसे अपडेट येत आहेत त्यानुसार भाजपचे केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी नागपूर मतदार संघातून पुढे आहेत. तसेच चंद्रपूर मतदार संघाचे गृहराज्यमंत्री हंसराज अहिर आघाडीवर आहेत. तसेच धुळे मतदार संघाचे उमेदवार आणि संरक्षण राज्य मंत्री सुभाष भांबरे हे आघाडीवर आहेत.

नागपुर
देशात सर्वाधिक संघात चर्चिला जाणाऱ्या मतदार संघापैकी एक असणाऱ्या नागपूर मतदार संघात सध्या भाजपचे नितीन गडकरी आघाडीवर आहेत. नागपूर मतदार संघात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी विरुद्ध काँग्रेसचे नाना पटोले यांच्या लढतीमुळे ही निवडणूक खूपच चर्चेत आली. नाना पटोले हे नागपूरच्या मतदारांसाठी बाहेरचे उमेदवार असले तरी नितीन गडकरींना त्यांनी चांगलीच लढत देत आहेत. लोकसभा मतदार संघात एकूण मतदार २१ लाख ६० हजार २१७ मतदार आहेत. यंदा ५४.७४ टक्के मतदान झाले असून ११ लाख ८२ हजार ५०७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी रिंगणात असल्याने संपूर्ण देशाचे लक्ष नागपूरच्या निकालाकडे लागले आहे. नागपुरात संघ मुख्यालय आहे तसेच गडकरी यांचे नाव मधल्या काळात पंतप्रधानपदाचे दावेदार म्हणून चर्चेत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही हे गृहशहर आहे. देशातील प्रमुख वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी आणि वरिष्ठ पत्रकारांनी नागपूरला भेट घेऊन जनमानसाचा कौल घेतला होता.

चंद्रपूर
भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार हंसराज अहिर यांना भाजपाने पुन्हा उमेदवारी दिली. या मतदारसंघातून अहिर हे चारवेळा लोकसभेवर निवडून गेले आहेत. आता दखील ते आघाडीवर आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेनेतून काँग्रेसमध्ये आलेले सुरेश धानोरकर यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे.

चंद्रपूरमध्ये १९ लाख ८ हजार ५५५ मतदारांची संख्या असून १२ लाख ३४ हजार १०१ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये पुरुषांचे प्रमाण ६६.१४ टक्के आहे तर महिलांचे प्रमाण ६३.०९ टक्के आहे. या मतदारसंघामध्ये एकूण ६४.६६ टक्के मतदान झाले आहे. २०१४ च्या तुलनेत चंद्रपूरमध्ये मतदानाची टक्केवारी केवळ १.४१ टक्क्यांनी वाढली आहे.

धुळे
धुळे लोकसभा मतदारसंघात भाजप पक्षाकडून डॉ. सुभाष भांबरे यांना उमेदवारी देण्यात आली होती. सध्या ते आघाडीवर आहेत. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून कुणाल पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. धुळे लोकसभा मतदारसंघात एकूण मतदार – १९ लाख ०४ हजार ८५९ मतदार आहेत. त्यापैकी एकूण १० लाख ७९ हजार ७४८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. या मतदार संघात ५६.६८% टक्के मतदान झाले.