लोकसभा निवडणूक २०१९ : पहिल्या टप्प्याची अधिसूचना जारी ; ११ एप्रिलला मतदान 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात लोकसभेच्या ९१ जागांसाठी निवडणूक घेतली जाणार असून ११ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यासाठी मतदान पार पडणार आहे.

पहिल्या टप्प्यातील अधिसूचनेच्या आदेशावर राष्ट्रपतींनी स्वाक्षरी केली असून, त्यानंतर निवडणूक आयोगाने हि अधिसूचना जारी केली आहे.  पहिल्या टप्प्यातील मतदारसंघात सोमवार पासून उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.  अर्ज दाखल करून घेण्याची सोमवारी सुरु झालेली प्रक्रिया २५ मार्च पर्यंत चालू राहणार आहे.  २६ मार्चला उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून, उमेदवार आपले अर्ज २८ मार्च पर्यंत मागे घेऊ शकणार आहेत.  त्याच दिवशी सायंकाळी पाच नंतर मतदारसंघातील उमेदवारांची सूची जाहीर करण्यात येणार आहे. तसेच अपक्षांना चिन्ह वाटली जाणार आहेत.

पहिल्या टप्प्यातील राज्यनिहाय मतदारसंघांची संख्या

महाराष्ट्र (७), आंध्र प्रदेश (२५),  अरुणाचल प्रदेश (२),  आसाम (५),  बिहार (४),  छत्तीसगड (१),  जम्मू-काश्मीर (२),  मणिपूर (१), मेघालय (२),  मिझोरम (१),  नागालँड (१),  ओडिशा (४),  सिक्किम (१),  तेलंगणा (१७),  त्रिपुरा (१),  उत्तर प्रदेश (८),  उत्तराखंड (५),  पश्चिम बंगाल (२),  अंदमान आणि निकोबार बेटे (१),  लक्षद्वीप (१) अशा एकूण ९१ मतदारसंघात लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडणार आहे.

पहिल्या टप्प्यात निवडणूक होणारे महाराष्ट्रातील हे आहेत मतदारसंघ

नागपूर, वर्धा, रामटेक (एस.सी राखीव), भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर (एस.टी राखीव), चंद्रपूर,  यवतमाळ-वाशीम अशा महाराष्ट्रातील सात मतदारसंघात निवडणूक पार पडत आहे.