नीरव मोदीचा जामीन लंडनच्या कोर्टाने फेटाळला

लंडन : वृत्तसंस्था – पीएनबी घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदीचा जामीन अर्ज लंडनच्या वेस्टमिन्स्टर कोर्टाने फेटाळला आहे. भारतीय तपास यंत्रणेला मोठे यश आले आहे. मोदीला जामीन मिळू नये यासाठी तपास यंत्रणांनी कोर्टात आपली बाजू दमदारपणे मांडली. या पुढची सुनावणी २६ एप्रिल रोजी होणार आहे. यावेळी नीरव मोदीला कोर्टात हजर न करता व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे सहभागी करण्यात येणार आहे.

आज कोर्टात झालेल्या सुनावणी दरम्यान, अनेक धक्कादायक खुलाशे झाले. भारताच्या अधिकृत प्रतिनिधीच्या वतीने बाजू मांडणाऱ्या टॉबी कॅडमन यांनी कोर्टात सांगितले की, नीरव मोदीने एक साक्षीदार आशिष लाड याला बोलावून त्याला जीवे मारण्याची धमकी दिली होती. तसेच तो भारतीय तपास पथकांना सहकार्य करीत नाही. त्याला जामीन द्यावे असे कोणतेही ठोस कारण उपलब्ध नाही, त्यामुळे त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा. जर त्याला जामीन मंजूर झाला तर तो देश सोडून निघून जाईल त्याचबरोबर तरुंगातून बाहेर आल्यानंतर पुरावेही नष्ट करु शकतो. दरम्यान, कोर्टाने दोन्ही बाजूंकडील युक्तीवाद ऐकल्यानंतर भारताच्या युक्तीवादावर शिक्कामोर्तब करीत नीरव मोदीचा जामीन अर्ज फेटाळून लावला. तसेच पुढील सुनावणी २६ एप्रिल रोजी ठेवली. त्यामुळे आता पुढील महिनाभर नीरव मोदीला तुरुंगातच रहावे लागणार आहे.

या युक्तीवादावर वेस्टमिन्स्टर कोर्टाचे मुख्य न्यायाधीश एम्मा अर्बथनॉट यांनी निर्णय दिला. अर्बथनॉट हे तेच न्यायाधीश आहेत ज्यांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाचे आदेश दिले होते. दरम्यान, नीरव मोदीच्या वकिलाने सुनावणीपूर्वी सांगितले की, प्रभावीपणे याचिका दाखल करण्याचा प्रयत्न करु. मात्र, यात त्यांना यश आले नाही. नीरव मोदीला लंडनमध्ये अटक झाल्यानंतर यापूर्वी जिल्हा न्यायाधीश मेरी मॅलोनच्या कोर्टात पहिल्यांदा नीरव मोदीचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. यावेळी भारताची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी कोर्टाला सांगितले होते की, नीरव मोदी सुमारे दोन अब्ज डॉलरच्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी भारताला हवा आहे. त्यानंतर आता दुसऱ्यांदा त्याला कोर्टाने दणका दिला आहे.

Loading...
You might also like