अजब परंपरा : या गावातील प्रत्येक महिलेचे केस 7 फूट 

बीजिंग : वृत्तसंस्था – प्रत्येक महिलेला वाटते की, तिचे केस काळेभाेर आणि लांबसडक असावेत. लांब केस ठेवण्यासाठी महिला नाना प्रकारचे उपाय करताना दिसतात. परंतु एक गाव असे आहे जिथे महिलांचे केस चक्क 3 ते 7 फूट लांब आहेत. चीनमधील हे गाव आहे. विशेष म्हणजे असे लांब केस ठेवणे ही या गावातील महिलांची आवड नाही तर इथली परंपराच आहे. चीनमधील ‘गुआंगशी’ प्रांतातील ‘हुआंगलुओ’ गावातील ही परंपरा आहे.
‘हुआंगलुओ’ गावातील ही परंपरा 200 वर्षांपासून चालत आलेली आहे. या गावातील महिलांची ओळख म्हणजे काळे, लांब आणि दाट केस होय. म्हणूनच या गावाला ‘लाँग हेअर व्हिलेज’ म्हणूनही ओळखले जाते. ‘हुआंगलुओ’मध्ये सध्या 60 महिला असून, या सर्वांचे केस सात फुटापर्यंत वाढलेले आहेत. मुख्य म्हणजे या गावात प्रत्येकवर्षी 3 मार्च रोजी ‘लाँग हेअर फेस्टिव्हल’ साजरा केला जातो. यावेळी येथील सुकेशिनी महिला गाणे गात, नृत्य करत आपल्या लांबसडक केसांचे प्रदर्शन करतात. उल्लेखनीय म्हणजे या फेस्टिव्हलमध्ये केवळ विवाहित महिलाच भाग घेतात. हा सण पाहण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक ‘हुआंगलुओ’ला येतात.
ज्यावेळी या गावातील तरुणी 18 वर्षांची होते, तेव्हाच फक्त तिचे केस कापले जातात. सदर तरुणी ही वयात आली असून ती विवाहयोग्य बनली आहे असा याचा अर्थ होतो. फक्त एकदाच तिचे केस कापले जातात. यानंतर तिचे केस कधीच कापले जात नाहीत. केसांना घेऊन आणखी एक परंपरा या गावात आहे. ती म्हणजे ज्यावेळी या तरुणी आपला जीवनसाथी निवडतात, तेव्हा त्या आपला चेहरा स्कार्फने झाकतात. तसेच कापलेले केस भेट म्हणून पतीला देतात. अशी आगळीवेगळी परंपरा येथे आहे.