2 वेळा मिळाली वाईट बातमी, 95 दिवसानंतर हॉस्पीटलमधून घरी परतला ‘कोरोना’ रूग्ण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रुग्णालयाच्या वतीने कोरोनाच्या एका रुग्णाच्या कुटुंबाला त्याचा मृत्यू होणार असल्याची माहिती दोनदा देण्यात आली. पण 95 दिवस रुग्णालयामध्ये राहिल्यानंतर कोरोना रुग्ण बरा झाला व तो घरी परतला. ही घटना ब्रिटनची आहे. तीन मुलांचे वडील कीथ वॉटसन तीन महिन्यांहून अधिक काळ रुग्णालयात राहिल्यानंतर 25 जूनला घरी परत आले. दीर्घ उपचारामुळे त्यांचे वजन लक्षणीय प्रमाणात कमी झाले आहे.

एका वृत्तानुसार, कीथ ब्रिटनमध्ये कोरोनामुळे सर्वात जास्त काळापर्यंत (95 दिवस) आजारी राहणारे व्यक्ती बनले आहेत. याआधी ब्रिटनमध्ये स्टीव्ह व्हाइट 92 दिवसांच्या उपचारानंतर बरे झाले होते. 52 वर्षीय कीथ वॉटसन कोमात गेले होते. त्यांना एका महिन्यापेक्षा जास्त काळ व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांनी आयसीयूमध्ये सुमारे 41 दिवस घालवले. जेव्हा त्यांच्या किडनीने आणि फुफ्फुसांनी जवळजवळ काम करणे थांबवले, तेव्हा कुटुंबाला एक वाईट बातमी कळवण्यात आली की त्यांचा मृत्यू जवळ आला आहे.

कीथ वॉटसन म्हणाले, मी जिवंत आहे यावर माझा विश्वास बसत नाही. मी अशा लोकांबद्दल विचार करतो जे असे करू शकले नाहीत. वॉटसन हे अस्थमाने देखील पीडित राहिले आहेत. 20 मार्च रोजी त्यांना त्रास झाल्यामुळे ते रुग्णालयात गेले होते. अधिक माहिती म्हणजे ब्रिटनमध्ये व्हेंटिलेटरवर ठेवलेल्या कोरोनामधील दोन तृतीयांश रुग्णांचा मृत्यू झाला आहे. किथला रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यावेळी ब्रिटनमध्ये कोरोनामुळे केवळ 144 मृत्यू झाले होते परंतु जेव्हा ते बाहेर आले तेव्हा ब्रिटनमध्ये कोरोनामुळे तब्बल 43,000 लोक मरण पावले होते.