वाहतूक शाखेची धडक मोहीम, 37800 रुपये दंड वसूल

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन (शरद पुजारी) – लोणी काळभोर वाहतूक शाखेने पुणे-सोलापूर महामार्गावर अनधिकृतरित्या उभ्या असलेल्या वाहनांवर कारवाईचा बडगा उचलला असून वाहतूकीला अडथळा ठरणाऱ्या 91 वाहनांवर कारवाई करत 37 हजार 800 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

पुणे-सोलापूर महामार्गावर रस्त्याच्या बाजूला चारचाकी वाहने उभी करुन वाहतूकीस अडथळा निर्माण केला जात होता. लोणी काळभोर वाहतूक शाखेने कवडीपाट टोलनाका पासून उरुळी कांचनपर्यंत या महामार्गावरील उभ्या वाहनांवर धडक कारवाई केली. यात सर्व गाड्यांना जॅमर लावण्यात आले व वाहन मालकांना दंड भरण्यास भाग पाडले. सर्वात वर्दळीचे ठिकाण म्हणजे लोणी स्टेशन व उरुळी कांचन येथील एलाईट चौक व तळवाडी चौक होय येथे कायमच वाहतूक कोंडी होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला अवैधरित्या वाहने उभी केली जातात. यावर कारवाई करण्यात यावी अशी वारंवार मागणी होत असे. तत्कालीन पोलिस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी या समस्येवर कारवाईचा धडाका उडवला होता. दररोज जॅमर लावण्यात येत होते. त्यामुळे महामार्गावरील अवैधरित्या उभ्या वाहनांची गर्दी कमी झाली होती. परंतु अलिकडे पुन्हा या वाहन चालकांनी आपले बस्तान बसवले. यामुळे पुन्हा वाहतूक कोंडीचा प्रश्न उभा राहिला. पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांनी वाहतूक शाखेला यावर ताबडतोब कारवाई करण्याच्या सूचना दिल्या यावर वाहतूक शाखेतील पोलीस हवालदार मुकुंद रणमोडे, पोलीस नाईक संदीप देवकर, पोलीस नाईक संतोष शिंदे, ट्रँफिक वार्डन सुशांत वरळीकर, सागर बरकडे, सागर राउत यांच्या पथकाने कारवाई करुन 37 हजार 800 रुपये दंड वसूल केला.

या महामार्गावर अनेक मंगल कार्यालये आहेत. त्यामुळे लग्न समारंभ असल्यास मोठी वाहतूक कोंडी होते त्यावेळी वाहतूक शाखा काय कारवाई करते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.