लोणीकंद : तुळापूर गावात एकाचा खून, आरोपीला अटक

 थेऊर – लोणीकंद पोलिस स्टेशन हद्दीत तुळापूर गावच्या हद्दीत एका परप्रांतीय मजुराने दुसऱ्या परप्रांतीय मजुराचा किरकोळ वादात डोक्यात खोरे मारल्याने मृत्यू झाला यातील आरोपीस लोणीकंद पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडले.

लोणीकंद पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुळापूर गावचे हद्दीत कळमदरा येथे सर्व्हे नं 144 मधील शिंदे यांच्या शेतात षटकोनी मनोऱ्याचे बांधकामांजवळ रॉबिन शोयलिन सद्दार वय 27 वर्षे, रा. पश्चिम बंगाल याने किरकोळ भांडणातून तेथे असलेल्या उत्तम राजेंद्र नाथ नासकर वय 46 वर्षे, रा. पश्चिम बंगाल याच्या डोक्यात खोऱ्याने मारून त्यास ठार मारले.

पोलीस निरीक्षक प्रताप मानकर व गुन्हे शोध पथक यांनी घटनास्थळी धाव घेतली. संशयिताची माहिती घेतली असता तो कोणत्याही प्रकारचा मोबाईल वापरत नसल्याने त्यास पकडणे अवघड व जिकिरीचे होते. परंतु, तक्रारदार व त्यांचे बांधकामावरील काँट्रॅक्टर रिझाऊल अब्दुल मुल्ला यांनी दिलेल्या वर्णनानुसार त्याचा लोणीकंद पोलीस ठाणे हद्दीत वेगवेगळ्या पथकाच्या माध्यमातून शोध घेण्यास पो. नी. प्रताप मानकर यांनी गुन्हे शोध पथकास सांगितले. यावर गुन्हे शोध पथकाने वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेतला असता तो वन खात्याच्या जागेत तुळापूर येथे सापडला. त्यास ताब्यात घेऊन पोलिस स्टेशनला आणून चौकशी केली असता त्याने त्याचे नाव रॉबिन शोयलिन सद्दार वय 27 वर्षे, रा. जयनगर, पश्चिम बंगाल असे सांगून रात्री उत्तम व त्याचेमध्ये शाब्दिक वाद होऊन त्याच रागात त्याचे डोक्यात खोऱ्याने मारले असल्याचे सांगितले. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत.

ही कामगिरी पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक केशव वाबळे, पोलीस उपनिरिक्षक हणमंत पडळकर, गुन्हे शोध पथकाचे बाळासाहेब सकाटे, श्रीमंत होनमाने, दत्ता काळे, समीर पिलाने, ऋषिकेश व्यवहारे, संतोष मारकड, सूरज वळेकर यांनी केली आहे.