9 लाखाची गाडी चोरणाऱ्याला अटक

वाघोली : पोलीसनामा ऑनलाइन – कंपनीच्या नवीन कोऱ्या गाड्या घेऊन येणाऱ्या कंटेनर चालकाला तुम्हाला पत्ता माहिती नाही, चला मी दाखवतो’ असे म्हणून कंटेनरमधील ३ गाड्यांपैकी २ गाड्या डिलिव्हरी करुन येईपर्यंत उर्वरित तिसरी चारचाकी गाडी (अंदाजे किंमत नऊ लाख रुपये) चोरणाऱ्या गजानन उर्फ गज्या दगडू गवई उर्फ काळे, वय ३० वर्षे (रा. इसोली, ता-चिखली, जि-बुलढाणा) यास लोणीकंद पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने जेरबंद बंद केले.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रतनलाल गुदाराम गुज्जर,वय-२८ वर्षे (रा.तोडपुरा, राजस्थान) यांनी एका अनोळखी व्यक्ती विरुध्द फिर्याद दाखल केली होती. ९ लाख रुपये किंमतीची मारुती सुझुकी कंपनीची पांढऱ्या रंगाची ब्रीझा गाडी चोरुन लंपास केल्यानंतर लोणीकंद पोलिसात ३७८ नुसार अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला होता.

लोणीकंद पोलीसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सासवड रोडवरील वडकी गावा जवळील ऑटो विस्टा मारुती सुझुकी शोरुमजवळएक इसम, गाईड आहे असे सांगून बाहेरील राज्यातून येणाऱ्या कंटेनरच्या ड्रायव्हरला विश्वासात घेवून त्यांची दिशाभूल करत आहे. गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार बाळासाहेब सकाटे व ऋषिकेश व्यवहारे यांनी तात्काळ त्या ठिकाणी जावून खात्री करुन त्यास ताब्यात घेतले. ताब्यात घेतल्यानंतर विश्वासात घेवून अधिक चौकशी केली असता त्याने दि. १८/९/२०१९ रोजी लोणीकंद हद्दीजवळील वाघोली कटकेवाडी येथील कोठारी व्हील्स या कंपनीच्या डिलिव्हरी साठी कंटेनर मधून आणलेल्या पांढऱ्या रंगाच्या विटारा ब्रीझा या गाडीची चोरी केली व चोरलेली गाडी उस्मानाबाद येथील आपल्या ओळखीच्या एका व्यक्तीच्या घरासमोर उभी केली असल्याचे सांगितले.

गुन्हे शोध पथकाचे कर्मचाऱ्यांनी वरिष्ठांच्या आदेशाने उस्मानाबाद येथे जाऊन आरोपीने सांगितल्याप्रमाणे सदर ठिकाणच्या व्यक्तीकडे चौकशी केली असता, त्याने सांगितले की, काही दिवसांपूर्वी गजानन काळे हा ब्रीझा गाडी घेऊन माझ्या मित्राच्या ओळखीने माझ्याकडे आला होता. परत येतो असे सांगून जो गेला, तो अद्यापपर्यंत परत आलाचं नव्हता. सदर गाडी अशीच लावून होती. पोलिसांनी उस्मानाबाद येथून गुन्ह्यातील ब्रीझा ही गाडी जप्त करुन व कायदेशीर सोपस्कर करुन ताब्यात घेतली. आरोपीने केलेल्या गुन्ह्याबाबत कबुली दिली असता त्यास अटक करुन न्यायालयात हजर केले असता कोर्टाने त्यास १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

चोरीचा तपास कामी हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सई भोरे पाटील, लोणीकंद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डी.एस.हाके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार बाळासाहेब सकाटे, समीर पिलाने, ऋषिकेश व्यवहारे यांनी केला.

Visit : Policenama.com