लोणीकंद : चाकूच्या धाकानं लुटणार्‍या टोळीला अटक

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन – चाकूचा धाक दाखवून लुटमार करण्याचे प्रमाण अलिकडे वाढत असल्याने अशा घटनांवर प्रतिबंध ठेवण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी ग्रामीण पोलिसांना दिल्या. यावर लोणीकंद पोलिसांनी अशा घटना रोखण्यासाठी रात्र गस्ती पथक तयार केले. हे पथक गस्त घालत असताना ही लुटमार करणारी टोळी लोणीकंद पोलिसांच्या तावडीत सापडली असून यात दोन जण गजाआड केले आहेत.

लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणीकंद पोलिस स्टेशनच्या हद्दीत वाघोली परिसरात गेल्या काही वर्षात नागरिकीकरण झपाट्याने वाढत गेले त्याच बरोबर या परिसरात गुन्ह्याचे प्रकारही वाढत गेले. विशेष म्हणजे चाकूचा धाक दाखवून एकट्या वाटसरुला गाठून लुटमार केले जायचे. यावर हवेली उपविभागीय पोलिस अधिकारी सई भोरे पाटील यांच्या सूचनेनुसार पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांनी आपले सहकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश वाबळे,पोलिस उपनिरीक्षक हनुमंत पडळकर, सहाय्यक फौजदार भारत वेताळ, पोलिस हवालदार बाळासाहेब गाडेकर, बाळासाहेब सकाटे, पोलिस नाईक गणेश शेंडे, श्रीमंत होनमाणे, समीर पिलाने, सुरज वळेकर, डी एस काळे, अमोल गायकवाड, योगेश भंडारे, ॠषीकेश व्यवहारे आदीना रात्रपाळी गस्ती पथकात नेमणूक केली.

आज गुरुवार दि.19 मार्च रोजी पहाटे पावने पाच वाजण्याच्या सुमारास केसनंद फाटा येथील जे जे नगर जवळ ज्ञानेश्वर आश्रम वाघमोडे हे पायी चालत असताना एका मोटारसायकलवरुन तीन जण येऊन एकाने चाकूचा धाक दाखवत खिशात किती पैसे व मोबाईल देऊन टाक नाही तर कापून टाकिन असा दम दिला व काॅलर पकडली. त्यांनी त्याला झटका देऊन पळ काढला असता या तिघांनी त्यांचा पाठलाग केला हे तिघे एका माणसाच्या मागे धावत असल्याचे गस्तीवर असलेल्या एस डी काळे व सुरज वळेकर यांना दिसले त्यांनी त्यांचा पाठलाग केला व दोघांना ताब्यात घेतले त्यांच्याकडे चौकशी केली असता त्याचे नाव कृष्णा राजु थोरात (रा. वाघोली) व अजय बाळासाहेब माने अशी आहेत. त्यांच्याकडून एक मोटारसायकल, चाकू, पाच मोबाईल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तिसऱ्या व्यक्तीची सर्व माहिती मिळाली आहे. या कामगिरीवर खुष होऊन पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी वळेकर व काळे यांना दहा हजार रुपयाचे बक्षीस जाहीर केले.