लोणीकंद गुन्हे प्रकटीकरण पथकाकडून दोन सराईत साखळी चोर गजाआड

पुणे (वाघोली) : पोलीसनामा ऑनलाइन – येथील बीजेएस कॉलेजजवळ बकोरी फाटा येथून महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र व चैन चोरून दुचाकीवरून पळून जाणाऱ्या दोघांना लोणीकंद पोलिसांच्या डी बी पथकाने अटक केली असून त्यांच्याकडून चोरलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोघेही अट्टल गुन्हेगार असून त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

धनराज शांतीलाल शेरावत (रा. सणसवाडी), अरमान प्रल्हाद नानावत (रा. वढू खुर्द) असे मंगळसूत्र चोरी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन महिन्यापूर्वी वाघोली येथील बकोरी फाटा परिसरामध्ये भाजी घेत असताना महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र व चैन चोरट्यांनी लंपास केली होती. याबाबत लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस चोरट्यांचा तपास करीत होते. वाघोली येथे पेट्रोलिंग करीत असताना डी बी पथकाला धनराज शेरावत संशयितरित्या फिरत असताना सापडला. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने साथीदार अक्षय शेरावत, अरमान नानावत यांच्या मदतीने वाघोलीत महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र व चैन चोरल्याची कबुली दिली. अरमान नानावत यास वढू खुर्द येथून सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून चोरलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे इतर गुन्हे देखील यांच्याकडून उघड झाले असून वाकड, चंदननगर, सांगवी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.

सदरची कारवाई हवेलीच्या उपविभागीय अधिकारी सई भोरे पाटील, पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली डी बी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक हणमंत पडळकर, बाळासाहेब सकाटे, श्रीमंत होनमाणे, समीर पिलाणे, ऋषीकेश व्यवहारे, सुरज वळेकर यांनी केली आहे. पुढील तपास बाळकृष्ण वाडेकर करीत आहेत.

Visit : policenama.com

 

You might also like