लोणीकंद पोलिसांचा सलग ९६ तास जागता पहारा

  लोणीकंद : पोलीसनामा ऑनलाइन – १ जानेवारी रोजी पेरणे फाटा (कोरेगाव भिमा) येथील विजय स्तंभाला अभिवादन करण्यासाठी राज्यासह देशभरातील लाखो भीम अनुयायी येत असतात.परंतु मागील वर्षी झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर गृहखात्याकडून देण्यात आलेल्या आदेशामुळे पोलीस व जिल्हा प्रशासनाकडुन कडेकोट नियोजन करण्यात आले होते.

परिसरातील स्थानिक लोणीकंद पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक प्रताप मानकर यांच्यासह ८ अधिकारी आणि ५० कर्मचारी हे २८ डिसेंबर २०१८ ते १ जानेवारी २०१९ या चार रात्री झोपलेच नव्हते. हे कोणालाचं खरं वाटणार नाही! परंतु, वस्तुस्थिती तीच खरी आहे. पेरणे येथील १ जानेवारीचा विजयस्तंभ अभिवादनाच्या कार्यक्रमाच्या नियोजनापासून ते १ तारखेच्या रात्री उशिरापर्यंत पोलिस सतत कामात व्यस्त होते.

राज्यातील तब्बल चार हजार पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त लावण्यापासून, त्यांच्या निवास व भोजनाची व्यवस्था आणि लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीतील प्रत्येक गावागावात जाऊन नागरिकांशी संवाद व सलोखा साधून गुप्तवार्तां संकलनापर्यंतची जबाबदारी ही लोणीकंद पोलिसांवर होती. या सर्वांनी डोळ्यात तेल घालून सलग चार दिवसांच्या झोपेशिवाय काम केले. महाराष्ट्र पोलीस दलाच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच असे घडले असावे.

मागील वर्षीची दंगल आणि त्यानंतर हद्दीतील प्रत्येक गावागावांत घडणाऱ्या बारीक सारीक घडामोडींवरं लोणीकंद पोलिसांनी गेल्या महिनाभरापासून सतर्क राहून लक्ष ठेवले होते. महिनाभरात अनेक जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करुन लोणीकंद पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, पुणे पोलीस अधिक्षक संदीप पाटील, अतिरिक्त पोलिस अधिक्षक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आपले सर्व सहकारी अधिकारी व कर्मचारी यांना योग्य ती जबाबदारी देऊन, स्थानिक प्रत्येक राजकीय पदाधिकारी-कार्यकर्ते यांचाशी दैनंदिन संवाद साधून, छोट्या-मोठ्या चांगल्या-वाईट घटनांचे सखोल विश्लेषण आणि अभ्यास करुन दि.२८ पासून राज्यभरातून येणाऱ्या तब्बल ४ हजार पोलीस अधिकारी व कर्मचा-यांच्या निवासव्यवस्थेसह जेवण आणि बंदोबस्ताचे ठिकाणाच्या नियुक्तीपर्यंतचे सगळे नियोजन या सगळ्याच मंडळींनी दि.२७ रोजी पूर्ण कागदावर तयार केले होते. हि सर्व जबाबदारी स्वीकारताना यातील प्रत्येकाशी संवाद साधन्यासाठी सर्व अधिका-यांचे फोन सलग चार दिवस रात्रं- दिवस अखंडपणे सुरु ठेऊन बंदोबस्त पार पाडला.

अर्थात १ जानेवारीला संध्याकाळी पाचच्या पुढे सगळे नियंत्रणात आल्याचे आणि निर्विघ्नपणे पार पडत असल्याचा अंदाज येताच सगळ्यांचाच जीव भांड्यात पडला आणि कधी नव्हे ती शांत झोपेच्या आशेने डोळ्यांच्या पापण्या जड होत असल्याची जाणीव बहुतेकांना होवू लागली होती.

याच कार्याची दखल घेऊन लोणीकंद पोलीस स्टेशनला कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या कडून २५ हजार तर पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक संदीप पाटील यांच्याकडून ३५ हजाराचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. त्याचबरोबर परिसरातील वेगवेगळ्या सामाजिक व राजकीय संघटनांकडून लोणीकंद पोलीसांचे अभिनंदन करुन आभार मानन्यात येत आहे.