पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Lonikand Pune Crime News | दीड महिन्यांपूर्वी साखरपुड्याच्या कार्यक्रमात झालेल्या भांडणाच्या रागातून टोळक्याने तरुणाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. (Attempt To Murder)
याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी (Lonikand Police) तिघांना अटक केली आहे. ऋषिकेश रमेश झेंडे (वय २३, रा. वाघोली), अमन मुबारक शेख (वय २३), मनिष अनिल उबाळे (वय २०, तिघे रा. वाघोली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत सौरभ संतोष तांबे (वय २४, रा. पिंपळे जगताप, ता. शिरुर) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार लोणीकंदमधील भारत पेट्रोल पंप समोर आणि मैनिका हॉटेल समोर शनिवारी रात्री ९ वाजता घडला. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे मित्र अभिषेक सुधाकर मुजमुले व श्रीकांत हनुमंत आजबे यांच्यासह बुलेटवरुन जात होते. तेव्हा आरोपीही बुलेटवरुन आले. त्यांनी जुन्या भांडणाच्या कारणावरुन फिर्यादी व त्यांच्या मित्रांना पुढे जाण्यापासून अटकाव केला. ऋषिकेश झेंडे याने लोखंडी रॉडने फिर्यादीचा मित्र अभिषेक मुजमुले याच्या डोळ्याला गंभीर दुखापत केली. झेंडे याच्या मोटारसायकलवरील साथीदाराने फिर्यादीच्या हातावर व डोक्यावर लोखंडी रॉडने मारहाण करुन गंभीर दुखापत करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
पोलिसांनी त्यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे. सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र गोडसे तपास करीत आहेत.