डोक्यात वार करुन वृद्धेला लुटले

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – दुपारच्या वेळी घरात एकट्या असणाऱ्या वृद्धेच्या डोक्यात हत्याराने वार करुन सोन्याचे दागिने चोरल्याची घटना बुधवारी घडली. हा प्रकार पिंपरी येथील शनी मंदिराच्या पाठीमागे घडला.

अमृता बाई ठकुराणी (८५, रा. शनी मंदिराच्या मागे, पिंपरी) असे हल्ल्यात जखमी झालेल्या वृद्धेचे नाव आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ठकुराणी या बुधवारी दुपारी घरात एकट्याच होत्या. त्यावेळी एकजण तेथे आला. त्याने जबरदस्तीने घरात प्रवेश केला. घरात कोणी नसल्याचे पाहून वृद्धेच्या डोक्यात हत्याराने वार करुन जखमी केले. त्यानंतर वृद्धेच्या गळ्यातील, हातातील, कानातील सोन्याचे दागिने जबरदस्तीने काढून नेले.

संध्याकाळी ठकुराणी यांचा मुलगा आल्यानंतर हा प्रकार समोर आला. पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. आरोपीच्या मागावर पोलीस आहेत.