मुलीच्या लग्नाला दागिने करण्यास आलेल्या इसमास लुटले

दौंड : पोलीसनामा ऑनलाईन – (अब्बास शेख) – मुलीच्या लग्नासाठी दागिने करायला आलेल्या इसमास आपण पोलीस आणि निवडणूक कर्मचारी असल्याचे सांगत दोघांनी एक लाख रुपये लुटून नेल्याचा प्रकार घडला आहे. केडगाव-बोरीपार्धी रस्त्यावर हा प्रकार घडला असून याबाबत प्रकाश गंगाराम पवार रा.बोरीपार्धी.ता.दौंड याने फिर्याद दिली आहे.

याबाबत मिळालेल्या माहिती नुसार प्रकाश पवार यांच्या मुलीचे २६ एप्रिल रोजी लग्न आहे. तिच्या लग्नाच्या दागिन्यांसाठी प्रकाश पवार यांनी भिशी व इतर ठिकाणावरून पैसे जमवून ते केडगाव येथे दागिने बनविण्यासाठी आले होते यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन ईसमांनी आपण पोलीस असल्याचे ओळखपत्र दाखवून तुमच्याकडे पैसे आहेत असे म्हणत त्यांची झडती घेतली यावेळी त्यांच्याकडे असलेले एक लाख रुपये त्यांनी घेऊन प्लास्टिक पिशवीमध्ये ते पैसे टाकल्याचे भासविले आणि केडगाव पोलीस स्टेशनला या असे म्हणत निघून गेले यावेळी पवार यांनी आपली पिशवी तपासली असता त्यामध्ये पैसे नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले त्यावेळी त्यांनी केडगाव पोलीस स्टेशन गाठून सदरील इसमांवर फसवणूक करून एक लाख रुपये लुटून नेल्याची फिर्याद दिली आहे.