युवकाचे अपहरण करून लुटमार, आठवड्यातील दुसरी घटना

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन-खासगी शिकवणीसाठी आलेल्या १७ वर्षाच्या तरुणाला गावी सोडण्याच्या बहाण्याने त्याचे अपहरण करुन लुटल्याची घटना आज (सोमवार) सकाळी अकराच्या सुमारास घडली. तीन दिवसातील ही दुसरी घटना असल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

शहरातील कॉलेज कॉर्नर येथे खासगी शिकवणीसाठी आलेल्या एका युवकाला गावी सोडतो असे सांगून त्याचे अपहरण करून त्याला मारहाण करून त्याचा मोबाईल लंपास करण्यात आला. यामध्ये श्रेयस श्रीनिवास जोशी (वय 17, रा. कवलापूर) जखमी झाला  आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रेयस कुटुंबासमवेत कवलापूर (ता. मिरज) येथे रहातो. तो सांगलीतील कस्तुरबाई वालचंद महाविद्यालयात अकरावीत शिकत आहे. सध्या महाविद्यालयांना सुट्या आहेत. मात्र सोमवारपासून त्याची खासगी शिकवणी सुरू झाल्याने तो सकाळी दहाच्या सुमारास कवलापूरहून कॉलेज कॉर्नर येथे आला. अकराच्या सुमारास शिकवणी संपल्यानंतर गावी जाण्यासाठी बसची वाट पहात तो कॉलेज कॉर्नर परिसरात थांबला होता.

त्यावेळी दोन तरूण मोटारसायकलवरून त्याच्याजवळ आले. त्यांनी कवलापूरला जाण्याचा रस्ता विचारला. त्यानंतर त्यांनी श्रेयसला तू कुठे जाणार आहेस अशी विचारणा केली. श्रेयसने कवलापूरलाच जाणार असल्याचे सांगितले. नंतर तुला गावी सोडतो असे सांगून त्याला मोटारसायकलवर बसवले. त्याला टिंबर एरियाच्या पिछाडीस नेले. तेथून त्याला मार्केट यार्ड परिसरात नेले. तेथे गेल्यानंतर आमचे काम आहे ते करून आपण कवलापूरला जाऊ असे त्याला सांगितले. नंतर त्याला महावीर उद्यानमार्गे शंभर फुटी रस्त्यावर नेले. तेथे गेल्यावर गाडी चालकाने त्याचा मोबाईल साथीदाराकडे दिला. साथीदाराला तेथेच सोडून तो श्रेयसला घेऊन धामणी रस्ता परिसरात गेला. तेथे गेल्यावर फोन करायचा आहे असे सांगून श्रेयसकडील मोबाईल घेतला. नंतर त्याला मोबाईलचे लॉक काढून दे असे अपहरणकर्त्याने त्याला सांगितले. त्यावेळी श्रेयसला शंका आल्याने लॉक काढून देण्यास नकार दिला.

आरोपीने श्रेयसला तोंडावर बेदम मारहाण केली. श्रेयसचा मोबाईल घेऊन तो पसार झाला. श्रेयसने तेथे असणार्‍या एका दुकानात जाऊन घडला प्रकार सांगितला. त्या दुकानदाराने त्याच्या वडिलांच्या मोबाईलवर फोन करून त्यांना बोलावून घेतले.

तीन दिवसातील तिसरी घटना…

तीन दिवसांपूर्वी कॉलेज कॉर्नर परिसरात अशीच घटना घडली होती. कवठेएकंद (ता. तासगाव) येथील एका महाविद्यालयीन युवकाला अशाच प्रकारे मोटारसायकलवरून नेऊन मारहाण करून लुटण्यात आले होते. मात्र त्या युवकाने त्याबाबत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली नव्हती. त्यामुळे चोरट्यांनी दुसर्‍यांदा तसाच गुन्हा केला असावा असा संशय पोलिसांना आहे.

जाहिरात