आता प्रभु जगन्नाथाचे 545 कोटी YES बँकेत अडकले, भक्तांनी PM मोदींना केलं मदतीसाठी ‘आवाहन’

नवी दिल्ली : वृत्त्त संस्था – सर्वसामान्यांचे हाल होतच आहेत, पण आता तर देवाचेही पैसे येस बँकेत अडकले आहेत. ज्यांचे पैसे या बँकेत जमा होते ते राम भरोसे आहेत. परंतु, भगवान जगन्नाथाचे काय करायचे? त्यांचे एक दोन नव्हे, 545 करोड रूपये अडकले आहेत. या बँकेवर आर्थिक संकट आल्याचे समजताच ओडिशाच्या पुरीधाममध्ये खळबळ उडाली. मंदिराच्या बाहेर पुजारी जमा झाले होते. हळूहळू शेकडो लोक पोहचले. लोक वाटेल ते बोलत होते, परंतु प्रश्न एकच आहे, आता जगन्नाथ मंदिराचे कामकाज कसे चालणार? लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मंदिराचे पैसे मिळवून देण्याची मागणी केली आहे. आरबीआयने येस बँकेवर निर्बंध घालण्याच्या काही तास आधी गुजरातमधील एका कंपनीने आपले तब्बल अडीच कोटी रूपये काढून घेतल्याचे समोर आले आहे, आता भगवान जगन्नाथाला पीएम मोदी मदत करणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

प्रत्येक वर्षी मिळतात करोडो रूपये
ओडिशामध्ये जगन्नाथ मंदिराचे 545 करोड रूपये येस बँकेत जमा आहेत. दान आणि अर्पण केेलेल्या वस्तूंमधून देवाला प्रत्येक वर्षी कारोडो रूपये मिळतात. भगवान जगन्नाथाच्या नावावर अनेक ठिकाणी जमीनसुद्धा आहे. यावर काही ठिकाणी दुकाने तयार करण्यात आली आहेत तर काही ठिकाणी खाण व्यवसाय सुरू आहे. हे पैसेसुद्धा देवाच्या खात्यात जमा होतात. देशातील मोठी बँक येस बँके आता आर्थिक संकटात सापडली आहे. 50 हजार रूपयांपेक्षा जास्त पैसे काढण्यावर प्रतिबंध आहे. बँकेला एसबीआयने टेक ओव्हर केल्याचे म्हटले जात आहे.

मंदिराच्या पुजार्‍याने म्हटले, दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करा

येस बँकेचे देशातील खातेदार अस्वस्थ आहेत. आता तर भगवान जगन्नाथासह त्यांचे भक्तसुद्धा अस्वस्थ झाले आहेत. कारण त्यांच्या देवाचे पैसे अडकले आहेत. समाजवादी पार्टीचे ओडिशा अध्यक्ष रवी बेहरा यांनी सीएम नवीन पटनायक यांना पत्र लिहिले आहे. पीएम नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी या प्रकरणात लक्ष घालावे, अशी मागणी करण्यात आली आहे. मंदिराचे पुजारी इप्सित प्रतिहारी यांनी येस बँकेच्या दोषी अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

यापूर्वी एसबीआय आणि इलाहाबाद बँकेत जमा होत होते पैसे

पुरीच्या जगन्नाथ मंदिराच्या देखरेखीसाठी ओडिशात एक वेगळे प्रशासन आहे. एक सिनियर आयएएस अधिकारी मंदिर विभाग प्रशासनाचा प्रमुख असतो. तीन वर्षापूर्वी पी के महापात्र याचे प्रशासक होते. त्यांच्या काळात भगवान जगन्नाथाच्या नावाने येस बँकेत खाते उघडण्यात आले. त्यापूर्वी मंदिराचे पैसे स्टेट बैंक ऑफ इंडिया आणि इलाहाबाद बँकेत जमा होत असत.

ओडिशाच्या कायदे मंत्र्यांनी म्हटले, मंदिराचे पैसे सुरक्षित

ओडिशाचे न्याय मंत्री प्रताप जेना यांनी म्हटले की, मंदिराचे पैसे सुरक्षित आहेत. घाबरण्याचे कारण नाही. जगन्नाथ मंदिराच्या देखरेखीत पैशांची कमतरता पडणार नाही. जून महिन्यात भगवान जगन्नाथ रथयात्रा निघणार आहे. यासाठी देश विदेशातून लाखो लोक पुरीमध्ये येत असतात. पुढच्या महिन्यात अक्षय तृतीयापासून रथ बनवण्याच्या कामाला सुरूवात होणार आहे.