‘कोरोना’मुळे लग्न सोहळ्याची बदलली रीत

पुणे : परिवर्तन अथवा बदल हा निसर्गाचा नियम आहे. बदलाला आनंदाने सामोरे जा,असे म्हटले जाते. मग या नियमाला विवाह संस्था कशी अपवाद असेल ? विवाह म्हणजे प्रत्येकाच्या जीवनातील आनंदाचा सर्वोच्च क्षण असतो. म्हणूनच विवाह धुमधडाक्यात साजरा केला जाते. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव, लाॅकडाऊन आणि सोशल डिस्टंसिंगमुळे लग्नाची रीतच पार बदलून गेली आहे. लग्न सोहळे छोटेखानी पद्धतीने सुटसुटीत पद्धतीने साजरी करण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे.

कोरोना व्हायरसमुळे सामान्यांची लग्ने विना कटकट विनासायास होत आहेत. मानापमान नाही, रुसवा नाही, वाजंत्री नाही, हॉल नाही, जेवणावळी नाही, वऱ्हाडी मंडळी नाही, फक्त दोन कुटुंबातील मोजक्याच मंडळींमध्ये लग्न सोहळा अवघ्या पाच-दहा मंडळींमध्ये उरकला जात आहे. कोरोनाने लग्नसोहळ्याची रीतच बदलून टाकली आहे. ही बाब सामान्यांसाठी निश्र्चितच महत्त्वाचीच ठरली आहे, हे हडपसर येथील प्रल्हाद मसा आखाडे यांचे चिरंजीव संतोष यांच्या लग्नसोहळ्यात दिसून आले.

प्रल्हाद मसा आखाडे (हडपसर, लक्ष्मी कॉलनी) यांचे चिरंजीव संतोष आणि सुदाम मारुती केदारी यांची कन्या पूजा हिचा विवाह सोहळा आज (रविवार, दि. 24 मे 2020) दुपारी 12.40 वा. केदारी वस्ती (शिरसगाव काटे, ता. शिरुर) येथे झाला. लग्नसोहळा उरकून ही मंडळी लक्ष्मी कॉलनी (हडपसर, पुणे) येथील निवासस्थानी आली. त्यावेळी सोशल डिस्टन्सिंग पाळून टेल्को चाळीमधील नागरिकांनी आकर्षक रांगोळी काढून त्यांचे फुलांच्या वर्षावात स्वागत केले. त्यानंतर जवळ असलेल्या मंदिरात नववधूंनी दर्शन घेऊन घरामध्ये प्रवेश केला. म्हणतात ना ‘मियां बिबी राजी तो क्या करेगा काझी !’