Good News : गुढीपाडव्याला MHADA च्या 2890 घरांची सोडत

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (म्हाडा) पुणे, पिंपरी-चिंचवडसह सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल 2 हजार 890 घरांची सोडत काढण्यात येणार आहे. यात म्हाडाच्या योजनेतील 2 हजार 156 सदनिका आणि 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत उपलब्ध होणाऱ्या 734 सदनिका अशा एकूण 2 हजार 890 सदनिकांची संगणकीय सोडत पाडव्याच्या मुहूर्तावर मंगळवारी (दि. 13) काढली जाणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते सकाळी 9 वाजता त्यांच्या देवगिरी या शासकिय निवासस्थानी ऑनलाईन पध्दतीने ही सोडत काढण्यात येणार आहे.

यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, प्रधान सचिव एस. व्ही. आर. श्रीनिवास, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल डिग्गीकर आदी उपस्थित राहणार आहेत. दि. 13 एप्रिल रोजी 12.00 वाजल्यापासून ते 13 मे 2021 सायंकाळी 5 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज नोंदणी करता येईल. इच्छुकांनी https://lottery.mhada.gov.in तसेच www.mhadamaharashtra.gov.in या संकेत स्थळावरून अर्जाची नोंदणी करावे असे आवाहन करण्यात आले आहे.