आता तुमच्या पासपोर्टवर दिसणार ‘कमळ’, परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं ‘हे’ कारण

नवी दिल्ली  : वृत्तसंस्था – आज पासपोर्ट महत्वाच्या कागदपत्रामधील एक कागदपत्र झालं आहे. या पासपोर्टमुळे त्या देशाची ताकद किती याची देखील ओळख होते. परंतू तुम्हाला माहित आहे का ? आता तुमच्या पासपोर्टवर कमळाचे चिन्ह दिसणार आहे. केरळच्या कोझिकोडमध्ये कमळाचे चिन्ह असलेल्या पासपोर्टचे वाटप झाले आहे. त्यानंतर हा मुद्दा थेट संसदेत तापला. विरोधकांनी कठोर टीका केली. भाजपचे निवडणूक चिन्ह असलेल्या कमळाचा वापर पासपोर्टवर करण्यात आल्याने विरोधकांनी भाजपवर टीका केली. त्यानंतर ही आक्रमकता पाहून परराष्ट्र मंत्रालयाने तातडीने याबाबत खुलासा केला आहे.

image.png

पासपोर्टवर कमळाच्या चिन्हाचा वापर करण्यात आल्याबद्दल परराष्ट्र मंत्रालयाने हे राष्ट्रीय फुल असल्याचे सांगत देशाचे प्रतिक आहे सांगत सारवासारव केली. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, सुरक्षेच्या कारणास्ताव हा निर्णय घेण्यात आला आहे. काँग्रेस खासदार एम. के. राघवन यांनी लोकसभेत हा मुद्दा उपस्थित केला. वृत्तपत्रात आलेली माहिती देखील त्यांनी दाखवली. भाजपकडून सरकारी संस्थांचे भगवेकरण करण्यात येत असल्याची टीका राघवन यांनी केली.

संसदेतच हा मुद्दा उपस्थित झाल्याने परराष्ट्र मंत्रालयाने गंभीर दखल घेतली, त्यांनी प्रवक्ते रवीश कुमार यांच्याकडून तात्काळ स्पष्टीकरण मागवून घेतले. रवीश कुमार यांनी सांगितले की हे चिन्ह आपले राष्ट्रीय फुल आहे आणि बनावट पासपोर्ट शोधण्यासाठी आणलेल्या अत्याधुनिक सुरक्षा वैशिष्ट्यांपैकी हा एक भाग आहे. तसेच आंतरराष्ट्रीय नागरिक उड्डाण संघटनेच्या आदेशानंतरच सेक्युरिटी फिचर्स छापले जात असल्याचेही ते म्हणाले.

शिवाय कमळाच्या चिन्हाशिवाय इतर राष्ट्रीय प्रतिकांचा देखील यापुढे वापर केला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे पुढील महिन्यात तुमच्या पासपोर्टवर एक वेगळे चिन्ह दिसणार आहे.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/