प्रेमाचा करूण अंत ! प्रेमी युगुलाची रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या, जालना जिल्ह्यातील घटना

जालना : पोलीसनामा ऑनलाईन – औरंगाबाद येथून हैदराबादकडे जाणाऱ्या कांचनगुडा एक्स्प्रेस खाली उडी मारून तरुण तरुणीने आत्महत्या केल्याची घटना जालना तालुक्यातील दरेगाव शिवारात सोमवारी सायंकाळी घडली. पोलिसांना घटनास्थळी मिळालेल्या आधार कार्डवरून या दोघांची ओळख पटली असून शीतल शरद कान्हे (वय १९, रा. पांगारखेडा ता. अंबड ) , तुषार प्रेमानंद रगडे (वय २० रा. चंदनझिरा) अशी त्यांची नावे आहेत.

चंदनझिरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यशवंत जाधव यांच्यासह अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. या दोघांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. रात्री उशिरापर्यंत चंदनझिरा पोलिस ठाण्यात या प्रकरणी नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती.दरम्यान प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.