लव्ह जिहाद : ‘भाजप नेत्यांच्या घरी अशीच लग्नं झाली, त्याचे काय’ ?

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाइन –  उत्तर प्रदेशातील लव्ह जिहादच्या कायद्यावर (On the law of love jihad) राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी मत व्यक्त केले आहे. मला खोलात जायचे नाही. कुणाच्या कुटुंबाबद्दलही बोलायचे नाही; पण भाजपच्या काही मोठ्या नेत्यांच्या घरात अशी लग्नं झालेली आहेत. तिथे आपण याच पद्धतीने म्हणायचा का?, असा सवाल आ. पवार यांनी उपस्थित केला आहे.

येथील निर्मलकुमार फडकुले सभागृहात गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पवार म्हणाले, उत्तर प्रदेशात एक वर्षानी निवडणुका आहेत. त्यामुळे असे विषय समोर येत आहेत. मुळात असे विषय हे व्यक्तिगत असतात. आज संविधान दिन आहे. संविधानाने दिलेला हक्क आहे. तिथे एसआयटी लावली होती. या कामांसाठी पैसा लावला जातोय का? याची चौकशी झाली. पण यासाठी असा कुठलाही प्रकार नसल्याचे एसआयटीने दाखवून दिले आहे.

भाजप आमदार राम कदम यांनी महाराष्ट्रात असा कायदा करू म्हटले आहे. यावरही रोहित पवारांनी भाष्य केले. राम कदम यांना सांगा की बेरोजगारी मोठी आहे. मुलांच्या पोटाचं बघूया. मुलांच्या हाताला काम मिळवून त्यांना योग्य दिशा द्या. उगाचच तुम्ही दुसऱ्या मुद्याच्या दिशेने गेलात तर पिढी बरबाद होईल. लोकांची स्वप्नं बरबाद होतील. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव, कार्याध्यक्ष संतोष पवार, मनोहर सपाटे, अजिंक्यराणा पाटील, सुभाष गुळवे आदी उपस्थित होते.

माझ्यासाठी नातं महत्त्वाचे

पार्थ पवारांना डावलून रोहित पवारांना बळ दिल्याची खंत अजित पवारांना असल्याचा दावा एका पुस्तकात केला आहे. याबद्दल रोहित पवार म्हणाले, पुस्तक कुठलंही असलं तरी ते लिहिणाऱ्याच्या डोक्यानं लिहिले जाते. माझ्यासाठी नातं महत्त्वाचं आहे. हे नातं त्या लिहिणाऱ्यापेक्षा मोठं आहे.
विमानसेवेसाठी प्रयत्न करणार विमानसेवा नसल्याने सोलापुरात उद्योग येत नाहीत, या मताशी मी सहमत नाही. परंतु, सोलापुरातील विमानतळासाठी सुशीलकुमार शिंदे यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. आगामी काळात मीसुद्धा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.