प्रेमप्रकरणातून फर्ग्युसन रस्त्यावरील रेस्टॉरंटच्या कामगाराला बेदम मारहाण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – प्रेम प्रकरणातून फर्ग्युसन रस्त्यावरील रेम्बो रेस्टाँरंट अ‍ॅन्ड बारमधील कामगाराला चौघांनी हॉटेलातून बाहेर काढून बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

याप्रकरणी सुजित मसुरकर (वय 23, रा. नारायण पेठ) याने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, चौघांना अटक केली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हा रेम्बो रेस्टॉरंटमध्ये नोकरी करतो. दरम्यान, त्याचे एका मुलीसोबत त्याचे प्रेमसंबंध होते. यामुळे आरोपी व त्याच्यात वाद होते. दरम्यान, बुधवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास सुजित हा हॉटेलमध्ये काम करत असताना चौघेजण तेथे आले. त्यांनी सुजितला हॉटेलच्या बाहेर बोलाविले. तसेच, त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर आरोपी तेथून पसार झाले.

साहेबांची वस्तू चोरल्याचा आरोप करून पादचारी तरुणाला लुटले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कारमधून उतरून पायी चालत निघालेल्या तरुणाला अचानक समोर आलेल्या चोरट्यांनी तुच आमच्या साहेबांची चीप चोरल्याचे म्हणत जबरदस्तीने थांबविले. त्याचे खिसे तपासले आणि खिशातील रोकड व पाकिट काढून घेतल्याची घटना घडली आहे. बाणेर-पाषाण लिंक रोडवर हा प्रकार झाला आहे.

याप्रकरणी माणिक मांडे (वय 25, रा. बालेवाडी) यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अनोळखी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कामानिमित्त त्यांच्या कारने गुरूवारी साडेचार वाजण्याच्या सुमारास पाषाण-लिंक रोडवर आले होते. फिर्यादींनी दिलेल्या माहितीनुसार, येथील मी तुकाराम शाळेजवळ आल्यानंतर अचानक फिर्यादींसमोर काही तरूण येऊन उभे राहिले. त्यांनी आमच्या साहेबाची चिप तुच घेतली असून, ती परत देण्यास सांगितले. तसेच जबरदस्तीने त्यांचे खिशे तपासले. तसेच, खिशातील रोकड, पाकिट व इतर कागदे काढून घेतली. काही वेळाने पैसे व कागदपत्र काढून घेऊन पाकिट परत दिले. तसेच, पोरं मारण्यासाठी येतील म्हणून भिती दाखवून तेथून पळवून लावले. त्यानंतर आरोपी पसार झाले. अधिक तपास चतु:श्रृंगी पोलीस करत आहेत.

सहलीच्या अमिषाने 20 लाख रुपयांची फसवणूक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – कोथरूड भागात रिस्पाईट इंटरनॅशनल हॉलीडेज या नावाने कार्यालय सुरू करून नागरिकांना सहलीचे तसेच प्रिव्हीलेज बेनिफीटचे अमिष दाखवून 20 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी विश्वजीत एनकीकर (वय 36, रा. वडगांव-बुद्रुक) यांनी अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, रिस्पाईट इंटरनॅशनल हॉलीडेज प्रा. लि. कंपनीचे संचालक, ब्रॅंच मॅनेजर तसेच इतरांवर फसवणूकीसह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोथरूड परिसरात आरोपींनी रिस्पाईट इंटरनॅशनल हॉलीडेज प्रा. लि. या नावाने ऑफिस उघडले होते. त्याठिकाणी सहलींचे नियोजनाबाबत माहिती देण्यात आली होती. त्यावेळी फिर्यादी याठिकाणी गेल्यानंतर त्यांना देशात व विदेशात सहलीचे आयोजन तसेच प्रीव्हीलेज बेनिफीटचे अमिष दाखविले. त्यांचा विश्वास संपादन केला. त्यापोटी फिर्यादींकडून 2 लाख 65 हजार रुपये घेतले.

फिर्यादींसोबत आणखी या परिसरातील व इतर नागरिकांना अशाच प्रकारे सांगून त्यांच्याकडून एकूण 20 लाख 85 हजार 400 रुपये उकळले. मात्र, फिर्यादींना किंवा इतरांना सहलीला न नेता तसेच, ठरल्याप्रमाणे फायदे न देता त्यांची फसवणूक केली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर फिर्यादींनी पोलीसांकडे तक्रार दिली आहे. अधिक तपास तपास अलंकार पोलीस करत आहेत.

यात्रा डॉटकॉमद्वारे 24 हजाराला गंडा
सिंहगड रोड परिसरात राहणारे हर्षल अमृतकर (वय 35, रा. पिंपळे-सौदागर) यांच्या डेबिट कार्डची गोपनीय माहिती घेऊन यात्रा डॉटकॉम या संकेतस्थळावरून 24 हजाराला फसविले आहे. याबाबत सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आता वारज्यात पीएमपीएमएलमध्ये चोरली बांगडी…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – शहरात घरफोड्यांपेक्षा अधिक हैदोस घालणार्‍या पीएमपीएमएलमधील चोरट्यांनी स्वारगेट, हडपसर, शिवाजीनगरनंतर आता वारजेकडे मोर्चा वळविला असून, महिलेच्या हातातील 55 हजार रुपयांची बांगडी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.

याप्रकरणी 69 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या वारजे परिसरात राहण्यास आहेत. दरम्यान, त्या कर्वेनगर येथून डेक्कनकडे येण्यासाठी एका पीएमटीमध्ये शिरल्या. बसमधे तुफान गर्दी होती. याचाच फायदा घेऊन चोरट्यांनी फिर्यादींच्या हातातील 56 हजार रुपयांची सोन्याची बांगडी चोरून नेली. काही वेळाने फिर्यादींच्या हा प्रकार लक्षात आला. त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक ए. व्हि. कदम हे करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/