धक्कादायक ! प्रेयसीने बांधली राखी, प्रियकराची आत्महत्या

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – मुलीवर प्रेम करणा-या मुलाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी मुलीच्या नातेवाईकांनी दिली. तसेच प्रियकराच्या हातावर मुलीला राखी बांधण्यास भाग पाडले. यामुळे नैराश्य आल्याने प्रियकराने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणात प्रेयसीची बहीण, मामा, मामी विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना आठ फेब्रुवारी रोजी नागपूर शहरातील हिवरीनगर येथे घडली होती.

गोपाल वर्मा (वय-२१) असे आत्महत्या केलेल्या प्रियकराचे नाव आहे. गोपाळ हा बीकॉमचे शिक्षण घेत होता. तसेच तो कॅब चालक होता. त्याचे एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. यांचे प्रेमसंबध प्रेयसीच्या नातेवाईकांना समजल्यानंतर त्यांनी गोपाल याला त्रास देण्यास सुरुवात केली. गोपाल आणि मुलीचे मागील पाच वर्षापासून प्रेमसंबंध होते.

गोपाळ आणि मुलगी लग्न करणार होते. मात्र, नातेवाईकांचा या लग्नाला विरोध होता. गोपाळ आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी घरी गेला होता. त्यावेळी नातेवाईकांनी त्याला अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन मुलीपासून दूर राहण्यास सांगितले. तसेच बळजबरीने प्रेयसीच्या हातून राखी बांधली. त्यांच्यामध्ये बहीण-भावाचे नाते जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. या सर्व प्रकारामुळे गोपाळ याला नैराश्य आले होते. यातूनच त्याने राहत्या घऱात गळफास घेऊन आत्महत्या केली.

आत्महत्या करण्यापूर्वी त्याने लिहलेली चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. यामध्ये त्याने प्रेयसीची बहीण, मामा आणि मामीला जबाबदार धरले आहे. यावरून नंदनवन पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा तिघांवर दाखल केला आहे. पुढील तपास नंदनवन पोलीस करीत आहेत.