नागपूरात ‘प्रेमी’ युगुलाचा आत्महत्येचा प्रयत्न, पुण्यातील प्रियकराची प्रकृती ‘गंभीर’

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – फेसबुकवरुन त्यांची मैत्री झाली असली तरी ते एकमेकांवर खरोखर प्रेम करत होते. तिच्या नातेवाईकांनी लग्नाला नकार दिला. तिचे लग्नही ठरविण्यात आले. तेव्हा एकत्र जीवन जगता येत नाही तर एकत्र जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न त्या दोघांनी केला. विष घेतल्यानंतर प्रियसीला त्याच्या कडवटपणामुळे उलटी झाली. त्यामुळे ती बचावली असून प्रियकराचे विष मात्र त्याच्या पोटात गेल्याने त्यांची प्रकृती गंभीर आहे.

ओमकार कुताड (वय २३, रा़ पुणे) हा बी. ए.च्या शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थी आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, त्याची नागपूरमधील एका तरुणीबरोबर फेसबुकवर फ्रेंडशीप झाली. सातत्याने संपर्कात राहिल्याने त्यांच्यात प्रेम फुलत गेले. त्यानंतर त्यांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी सुरु झाल्या. त्याने एकदा हिंमत करुन तिचे घर गाठले. आईवडिलांकडे तिचा हात मागितला. त्याला त्यांनी नकार दिला. तरीही त्यांचा संपर्क सुरु होता. काही दिवसांपूर्वी तिच्या घरच्यांनी तिचे लग्न ठरविले. दोन दिवसांपूर्वी तिने हे ओमकार याला कळविले. ते समजताच तो अस्वस्थ झाला.

त्याने पहिल्या गाडीने नागपूर गाठले. मंगळवारी ते दोघे गांधीबाग पार्कमध्ये भेटले. त्यांच्यात बराच वेळ चर्चा झाली. पण त्यातून काही मार्ग त्यांना सुचला नाही. शेवटी त्यांनी एकत्र जीवन संपविण्याचा निर्णय घेतला. ओमकार याने आपल्याबरोबर विषाची बाटली आणली होती. दोघांनी बागेतच विषाची बाटली एकाचवेळी तोंडाला लावली. मात्र, त्याच्या कडवट चवीमुळे तिला उलटी होऊन विष सर्व बाहेर पडले. ओमकारच्या पोटात विष गेल्याने तो लगेच तडफडू लागला.

त्याची ती अवस्था पाहून ती जोरजोरात ओरडू लागली. तेव्हा बागेतील गार्ड व इतर लोक धावत आले. तोंडातून फेस आलेला तरुण पाहून जमलेल्या तरुणतरुणींनी मदत करायच्या ऐवजी व्हिडिओ काढण्यास सुरुवात केली. त्याचवेळी तो तरुण तसाच हिरवळीवर पडून होता. पोलिसांनीही तो मृत झाला असे समजून बराच वेळ तेथेच चौकशी करण्यात घालविला. तो जिवंत असल्याचे समजल्यावर धावपळ करुन त्याला रुग्णालयात दाखल केले. ओमकारची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.