मुलगी पटली नाही म्हणून रोडरोमिओने केली मांत्रिकाचीच हत्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एका तरुणाने आपल्याला हवी ती मुलगी मिळाली नाही म्हणून चक्क मांत्रिकाची गोळी झाडून हत्या केली आहे. उत्तराखंडमधील रुडकी येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. तरूणाने एका तरुणीला वश करण्यासाठी मांत्रिकाला पैसे दिले होते. पण काम न झाल्याने तरुणाने मांत्रिकाला पैसे मागितल्याने त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर तरुणासह चौघांनी मिळून मांत्रिकाची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे.

इरफान असे हत्या झालेल्या मांत्रिकाचे नाव आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुडकीच्या रामपूर गावात 16 जानेवारी रोजी रात्री उशिरा काही अज्ञात व्यक्तींनी वयोवृध्द इरफान यांच्यावर गोळी झाडली. यात ते जखमी झाल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासून चौघांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून चार बाइक आणि 1 पिस्तुल ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणाबाबत एसएसपी हरिद्वार डी. सेंथिल अबुदई यांनी सांगितले की, मृत व्यक्ती मांत्रिक विद्येच काम करत होती. आरोपींनी एका तरूणीला वश करण्यासाठी मांत्रिकाला काही पैसे दिले होते. पण काम न झाल्याने तरूणाने पैसे परत मागितल्यावर त्यांच्यात वाद झाला. पोलिसांनी सांगितले की, आरोपींपैकी एकाच्या वडिलांचा यादरम्यान मृत्यू झाला होता. त्यामुळे एक आरोपी त्या मांत्रिकाला मानत होता. नंतर तरूणाने मांत्रिकाची हत्या करण्याचा प्लॅन केला आणि दोन बाइकवरून 16 जानेवारीला रात्री उशीरा मांत्रिकावर गोळ्या झाडल्या. उपचारादरम्यान मांत्रिकाचा मृत्यू झाला.