भारतात सर्वात कमी दैनंदिन कोरोना रुग्णवाढ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात गेल्या 24 तासात 2 लाखांपेक्षा कमी नवे कोरोना रुग्णांची नोंद झाली असून गेल्या 207 दिवसांमध्ये आजचा सर्वात कमी कोरोना रुग्णवाढीचा आकडा नोंदविला आहे. विशेष म्हणजे, गेल्या सात दिवसांमध्ये प्रत्येकी 10 लाख लोकसंख्येमागे दैनंदिन पातळीवर वाढणाऱ्या नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये इतर देशांशी तुलना करता भारतात सर्वात कमी रुग्णांची वाढ होत आहे. भारताच्या लोकसंख्येची एकूण घनता पाहता देशासाठी ही अतिशय चांगली बातमी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केली आहे.

देशभरात शनिवारपासून (दि. 16) कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली. देशात आतापर्यंत 6, 74, 835 लोकांना कोरोना लसीचा पहिला डोस दिल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशात पहिल्या टप्प्यात एकूण 3 कोटी लोकांना कोरोनाची लस देण्यात येणार आहे. देशातील कोरोना रुग्णांची घटती संख्या सर्वांना सुखावणारी असून भारताकडून इतर शेजारी देशांनाही लशीचा पुरवठा केला जात असल्याबाबत जगात भारताचे कौतुक केले जात आहे.