मे महिन्यासाठी LPG स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचे नवे दर जारी, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्त संस्था – मे महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल कंपन्यांनी स्वयंपाकांच्या गॅसचे नवीन दर जारी केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, लग्नसराईत कमर्शियल गॅस सिलेंडरचे दर कमी झाले आहेत. मात्र, घरात वापरल्या जाणार्‍या 14.2 किलोग्रॅम वजनाच्या स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. कमर्शियल सिलेंडरच्या किमतीत राजधानी दिल्लीतच 46 रुपये प्रति सिलेंडरची कपात झाली आहे.

दिल्लीत अगोदर 19 किलोग्रॅमचा गॅस सिलेंडर 1641.50 रुपये होता, जो आता कमी होऊन 1595.50 रुपयांवर आला आहे. नव्या किमती आजपासून लागू झाल्या आहेत. यापूर्वी25 फेब्रुवारी, 1 मार्च आणि 1 एप्रिलला 19 किलोग्रॅमच्या गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली होती. लागोपाठ तीनवेळच्या वाढीनंतर मे महिन्यात हा सिलेंडर स्वस्त झाला आहे.

घरात वापरल्या जाणार्‍या 14 किलोग्रॅमच्या स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत मे महिन्यात सुद्धा एलपीजी गॅस सिलेंडरचा भाव 809 रुपयेच आहे. अशाप्रकारे कोलकातामध्ये 835 रुपये, मुंबईत 809 रुपये आणि चेन्नईत 825 रुपये प्रति सिलेंडर आहे.