भर उन्हाळ्यात सर्वसामान्यांना महागाईच्या झळा ; घरगुती गॅस सिलिंडर महागला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भर उन्हाळ्याच्या झळांसह आता सर्वसामान्यांना महागाईच्या झळाही बसणार आहेत. कारण घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात ६ रुपयांची वाढ झाली आहे. तर अनुदानित गॅस सिलिंडर ०. २८ रुपयांनी महागला आहे.

पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढत असल्याने महागाईची झळ सोसणाऱ्या ग्राहकांना आता गॅस सिलिंडरची दरवाढ सोसावी लागणार आहे. दर महिन्याच्या १ तारखेला गॅसच्या किमतीचा आढावा घेऊन दरामध्ये बदल केला जातो. यापूर्वी १ एप्रिललाही सिलिंडरच्या किमती वाढवण्यात आल्या होत्या. दिल्ली व मुंबईमध्ये विनाअनुदानित सिलिंडरचा दर ६ रुपयांनी महागला असून अनुदानित गॅस सिलिंडर दिल्लीमध्ये ०. २८ तर मुंबईमध्ये ०. २९ पैशाने महागला आहे. घरगुती गॅसच्या वाढलेल्या किमतीनंतर दिल्लीतल्या रहिवाशांना सबसिडीच्या सिलिंडरसाठी ५०२ रुपये मोजावे लागणार आहेत. तर सबसिडी नसलेल्या सिलिंडरसाठी ७३० हून अधिक रुपये मोजावे लागणार आहेत.