सबसिडी नसणार्‍या LPG गॅस सिलेंडरवर मिळवा सवलत, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशभरात उज्ज्वला गॅस योजनेमार्फत घराघरात चुलींची जागा गॅसने घेतली आहे. या गॅससाठी केंद्र सरकारकडून सबसिडी देण्यात येते. या अनुदानाचे पैसे थेट ग्राहकांच्या खात्यात जमा होतात. वर्षभरात एकूण १२ सबसिडी असणारे गॅस सिलिंडर मिळतात. त्यापुढे जास्त सिलिंडर घेतल्यास सरकारकडून सबसिडी मिळत नाही. तथापि, सबसिडी नसलेले घरगुती गॅस सिलिंडरसुद्धा तुम्हाला चांगली सूट मिळवून खरेदी करता येतात.

तेल कंपन्या देत आहेत सूट
कोरोना काळात डिजिटल पेमेंटला महत्त्व आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर तेल मार्केटिंग कंपन्यादेखील ऑनलाइन पेमेंट केल्यानंतर कॅशबॅक ऑफर करत आहेत. त्या माध्यमातून ग्राहक अधिकाधिक पेमेंट ऑनलाइन करतील. त्यात हिंदुस्थान पेट्रोलियम (Hindustan Petroleum), इंडियन ऑइल (Indian Oil) आणि भारत पेट्रोलियम (Bharat Petroleum) या तेल कंपन्या ग्राहकांना ऑनलाइन पेमेंटवर सवलती देत आहेत.

कशी मिळू शकते सूट ?
गॅस सिलिंडवर सवलत मिळवण्यासाठी तुम्ही पैसे भरताना ऑनलाइन पेमेंटचा पर्याय निवडा. त्यासाठी तुम्ही Paytm, PhonePe, UPI, BHIM, Google Pay, Mobikwik यांसारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर करू शकता. यातील बहुतांश प्लॅटफॉर्मवर पहिल्यांदा पैसे भरताना चांगला कॅशबॅक मिळतो. पेटीएम ग्राहकांना ५०० रुपयांपर्यंत कॅशबॅक देते.

त्याशिवाय तुम्ही इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड अथवा क्रेडिट कार्ड आदी पर्यायांचा वापर पेमेंट करण्यासाठी करू शकता. ऑनलाइन माध्यमातून तुम्ही घरबसल्या किंवा कुठेही असाल तात्काळ पैसे भरता येतात. यामुळे गॅस सिलिंडरच्या डिलिव्हरी वेळी घरात रोख रक्कम ठेवण्याची गरज लागत नाही.