बी.टेक विद्यार्थ्याच्या खूनप्रकरणी ‘बसपा’च्या माजी आमदाराचा मुलगा अमन बहादुर अटकेत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील उच्चभ्रू गोमती नगरमध्ये बी.टेक विद्यार्थ्याच्या चाकू भोकसून केलेल्या हत्येप्रकरणी बीबीडीचा विद्यार्थी अमन बहादूर याला अटक करण्यात आली आहे. अमन बहादूर हा बहुजन समाज पार्टीचे (बसपा) आमदार समर बहादूर यांचा मुलगा आहे. प्रशांत सिंगच्या हत्येमध्ये अमन बहादूरचादेखील सहभाग असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दरम्यान, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती.

दिवसाढवळ्या चाकू भोकसून हत्या –
शुक्रवारी (२१ फेब्रुवारी) गोमतीनगर भागात बी टेकचा विद्यार्थी प्रशांत सिंग याचा खून करण्यात आला. अलकनंदा अपार्टमेंटच्या गेटवर ही घटना घडली. काही दिवसांपूर्वी प्रशांतचा काही लोकांशी वाद झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, प्रशांत हा इनोव्हा कारमधून अलकनंदा अपार्टमेंटकडे येत होता. इनोव्हा अपार्टमेंटच्या गेटजवळ पोचली तेव्हा काही जणांनी कार रोखली आणि इनोव्हाचा काचा फोडून प्रशांतला बाहेर काढले. यानंतर, अपार्टमेंटच्या गेटवर चाकूने वार करत त्याची हत्या करण्यात आली.

12 ते 15 हल्लेखोर –
इनोव्हा चालवत असलेल्या साजिदने सांगितले की, ते लोहिया पार्क येथून येत होते. प्रशांतला तो अलकनंदावर सोडणार होता. गेटवर येताच 12 ते 15 मुलांनी त्यांना घेरले आणि मारहाण करण्यास सुरवात केली. साजिदने सांगितले की, सर्व मुले मला इकडे मारत होती आणि दुसर्‍या बाजूला प्रशांतवर चाकूने हल्ला केला, तो पळाला आणि थोड्या अंतरावरुन जाऊन खाली पडला. मारेकरी शिवीगाळ करत हाच आहे, हाच आहे असे बोलत होते.