Babri Demolition Case Verdict : अडवाणी, जोशी, उमा भारती यांच्यासह सर्व 32 जण निर्दोष

लखनऊ : वृत्तसंस्था – अयोध्याच्या बाबरी विध्वंस प्रकरणात निकाल जाहीर करताना सीबीआयचे विशेष न्यायाधीश सुरेंद्र कुमार यादव यांनी सर्व ४९ आरोपींची निर्दोष मुक्त केले. या प्रकरणातील सुनावणीदरम्यान १७ आरोपींचा मृत्यू झाला आहे. उर्वरित ३२ आरोपींनाही निर्दोष सोडण्यात आले. न्यायाधीशांनी हा निकाल वाचताना म्हटले की, ६ डिसेंबर १९९२ रोजी जे घडले, ती पूर्वनियोजित घटना नव्हती. घटना आकस्मिक होती. तसेच न्यायाधीश म्हणाले की, आरोपींविरूद्ध कोणते पुरावेही सापडलेले नाहीत.

घटना पूर्व नियोजित नव्हती
न्यायाधीशांनी आपल्या निर्णयात म्हटले की, घटनेच्या दिवशी विहिंप आणि तत्कालीन अध्यक्ष कै. अशोक सिंघल यांनी संतप्त जमावाला रोखण्याचा प्रयत्नही केला. न्यायाधीशांनी त्यांच्या निर्णयात अशोक सिंघल यांच्या एका व्हिडिओचाही उल्लेख केला. न्यायाधीश म्हणाले की, तेथे उपस्थित सर्व आरोपींनी कारसेवकांना रोखण्याचा प्रयत्न केला. असा कोणताही पुरावा मिळाला नाही की, ज्यावरून हे सिद्ध होईल कि यामागे कारस्थान रचले गेले होते.

न्यायाधीश काय म्हणाले?
निकाल देताना न्यायमूर्ती सुरेंद्र कुमार यादव म्हणाले की, ६ डिसेंबर १९९२ रोजी दुपारी १२ वाजता विवादित रचनेच्या पाठीमागे दगडफेक सुरू झाली. त्यावेळी अशोक सिंघल यांना रचना सुरक्षित ठेवायची होती, कारण त्या रचनेत मूर्ती होत्या. तेथे उपस्थित सर्व आरोपींनी संतप्त जमावाला थांबवण्याचा प्रयत्न केला. न्यायाधीश म्हणाले की, सीबीआयकडून जे फोटोची कॉपी पुरावे म्हणून उपलब्ध केले गेले, त्याची मूळ प्रत सादर केली गेली नाही. सीबीआयने साध्वी ऋतंभरा आणि इतर अनेक आरोपींच्या भाषणाच्या टेप्सला सील केले गेले नाही. न्यायाधीशांनी कार सेवकांनाही निर्दोष मुक्त केले. न्यायाधीश म्हणाले की, तेथे उपस्थित सर्व कारसेवक उन्मादी नव्हते. तर काही असामाजिक घटकांनी जमावाला चिथावले होते.

हे ३२ आरोपी झाले निर्दोष मुक्त
ज्या ३२ आरोपींना निर्दोष मुक्त केले गेले आहे, त्यात भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, कल्याण सिंह, उमा भारती, विनय कटियार, साघवी ऋतंभरा, महंत नृत्य गोपाल दास, डॉ. राम विलास वेदांती, चंपत राय, महंत धर्मदास, सतीश प्रधान, पवन कुमार पांडे, लल्लू सिंह, प्रकाश शर्मा, विजय बहादुर सिंह, संतोष दुबे, गांधी यादव, रामजी गुप्ता, ब्रज भूषण शरण सिंह, कमलेश त्रिपाठी, रामचंद्र खत्री, जय भगवान गोयल, ओम प्रकाश पांडे, अमरनाथ गोयल, जयभान सिंह पवैया, महाराज स्वामी साक्षी, विनय कुमार राय, नवीन भाई शुक्ला, आर.एन. श्रीवास्तव, आचार्य धमेंद्र देव, सुधीर कुमार कक्कर आणि धर्मेंद्र सिंह गुर्जर हे सामील आहेत.

मुख्यामंत्री योगी म्हणाले- न्यायाचा विजय
तर सीबीआय विशेष न्यायालयाच्या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त करत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, न्यायाचा विजय झाला आहे.