आयोध्या : 30 एप्रिलला राम मंदिराचं भुमी पूजन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशच्या अयोध्यामध्ये रामजन्मभूमीच्या भुमिपूजनाविषयी मोठी बातमी समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राम मंदिरचे भुमिपूजन ३० एप्रिल रोजी होणार आहे. पुढील महिन्यात ४ एप्रिल रोजी ट्रस्टच्या बैठकीत याची औपचारिक घोषणा केली जाईल.

मिळालेल्या माहितीनुसार ट्रस्ट या संघटनेत सहभागी होण्यासाठी आरएसएसचे सर संघचालक मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही आमंत्रित करेल. या भुमिपूजन करण्यासाठी देशातील प्रत्येक पवित्र नदीचे पाणी आणले जाईल. एवढेच नाही तर सर्व तीर्थक्षेत्रांची मातीही आणली जाईल. तत्पूर्वी २५ मार्च रोजी अस्थायी मंदिरात रामललाची मूर्ती स्थापित केली जाईल.

प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाची केली आहे विशेष तयारी
२५ मार्च रोजी योगी सरकारने रामललाच्या प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाची विशेष तयारी केली आहे. या कार्यक्रमात ट्रस्टच्या सदस्यांसह स्वत: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील उपस्थित राहतील. नवरात्रीचा पहिला दिवस असल्याने या दिवसासाठी फलाहारी प्रसादाची खास व्यवस्था केली जात आहे. रामलला फक्त फळांचेच सेवन करतील. तसेच यानंतर रामनवमी निमित्त रामललाच्या जन्मास देखील पहिल्यांदाच लाईव्ह टेलिकास्ट करण्याची योजना आहे. ट्रस्ट यावर विचारमंथन करीत आहे.

यात्रेसंबंधित मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या नाहीत
एकीकडे भव्य राम मंदिराच्या भूमिपूजनाची तयारी सुरू आहे, तर दुसरीकडे युपीसह देशभरात पसरलेल्या कोरोना विषाणूबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. यूपी सरकारनेही याबाबत अलर्ट जारी केला आहे. पण अयोध्येत २५ मार्चपासून सुरू होणाऱ्या राम नवमी यात्रेबाबत अद्याप मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या नाहीत. दरवर्षी लाखो लोक या यात्रेला येतात. सरकार हे निश्चितच सांगत आहे की लोकांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, लग्न-समारंभासारख्या मोठ्या कार्यक्रमांना टाळावे. घरात राहावे आणि स्वच्छतेची काळजी घ्यावी. परंतु अयोध्यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.