CAA Protest : UP मध्येआत्तापर्यंत 16 जणांचा मृत्यू, 4500 जण ताब्यात, 14 हजाराहून जास्त ‘सोशल’च्या पोस्टवर ‘अ‍ॅक्शन’

लखनऊ : वृत्तसंस्था – नागरिकत्व संशोधन कायद्याविरोधात देशात आंदोलनांचे सत्र सुरूच आहे. राजधानी दिल्लीसह अनेक राज्यात आंदोलन हिंसक झाले, ज्यात मोठ्याप्रमाणात सार्वजनिक संपत्तीचे नुकसान झाले आहे. उत्तर प्रदेशमध्ये मोठ्याप्रमाणात हिंसा झाली असून यामध्ये १६ लोकांचा मृत्यू झाला आहे. युपी पोलिसांनी याप्रकरणी आतापर्यंत ४५०० लोकांना ताब्यात घेतले आहे. तर हिंसा पसरवण्याच्या आरोपाखाली ७०५ लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. याशिवाय पोलिसांनी सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी १४, १०१ जणांवर कारवाई केली आहे.

३ दिवसात युपीत अनेक भागात हिंसक आंदोलने
नागरिकता संशोधन कायद्याविरोधात उत्तर प्रदेशात मागील तीन दिवसात सतत आंदोलने होत आहेत. राज्य सरकार आणि पोलीसांकडून करण्यात येत असलेल्या शांततेच्या आवाहनानंतरही अनेक भागात जाळपोळीच्या घटना घडल्या. या हिंसक घटनांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या आता १६ झाली आहे. पोलीस महानिरिक्षक, प्रवीण कुमार यांनी सांगितले की, मेरठमध्ये ४, फिरोजाबादमध्ये ३, कानुपर आणि बिजनोरमध्ये २-२, वाराणसी, संभल, रामपुर आणि लखनऊमध्ये प्रत्येकी १ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. याशिवाय आणखी एक व्यक्ती मरण पावल्याचे वृत्त आहे.

जखमींमध्ये २६३ पोलीस कर्मचारी, ५७ जणांना लागली गोळी
हिंसक घटनांमध्ये २६३ पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. यामध्ये ५७ जवानांना गोळी लागल्याचे म्हटले आहे. उत्तर प्रदेशच्या विविध शहरांमध्ये पोलिसांनी अडविल्यानंतरही आंदोलनकर्ते थांबले नाहीत. हिंसक झालेल्या जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलीसांना कडक पावले उचलावी लागली. यामुळे हिंसा आणखी भडकली. यामध्ये अनेक पोलीस वाहने आणि पोलीस चौक्यांना आग लावण्यात आली. यामुळे प्रकरण आणखी चिघळत गेले. उत्तर प्रदेश सरकार आता याप्रकरणी कारवाई करत आहे.

फेसबुकनंतर ट्विटरवर सर्वात जास्त आक्षेपार्ह पोस्ट
नागरिकत्व संशोधन कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनासह पोलीसांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकत असलेल्यांविरोधातही कारवाई सुरू केली आहे. दरम्यान प्रवीण कुमार यांनी आंदोलनाच्या स्थळांवरून ४०५ काडतूसे मिळाल्याचा दावा केला आहे. त्यांनी सांगितले की, सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकण्याप्रकरणी १०२ जणांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत १४,१०१ सोशल मीडिया पोस्टवर कारवाई करण्यात आली आहे. यापैकी ७,९९५ फेसबुक पोस्ट, ५९६५ ट्विट आणि १४१ युट्यूब पोस्ट आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/