भाजपच्या खासदार पुत्राने षडयंत्र रचत स्वत:वरच केला गोळीबार, मेहुण्याला पोलिसांनी घेतले ताब्यात

लखनौ : वृत्तसंस्था – मोहनलालगंज लोकसभा मतदारसंघाचे खासदार कौशल किशोर यांचा मुलगा आयुष यांना संशयितरित्या मंगळवारी रात्री गोळी लागली. त्यानंतर त्यांना ट्रामा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. आयुष हे रात्री उशिरा त्यांच्या मेहुण्यासोबत फिरत होते. त्याचदरम्यान त्यांना संशयितरित्या गोळी लागली. आता या प्रकरणाबाबत मोठी माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. यामध्ये पोलिसांनी सांगितले, की आयुष यांच्या परवानाधारक पिस्तुलातून गोळीबार झाला आहे. आयुष यांच्या मेहुण्याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी सुरु आहे. तसेच आयुष यांना गोळी लागल्याचे समजल्यानंतर खासदार किशोर यांची पत्नी जयदेवी या तातडीने ट्रामा सेंटरमध्ये पोहोचल्या. त्यानंतर त्यांनी संपूर्ण घटनेची माहिती घेतली. आयुष यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगितले जात आहे.

विरोधकांना अडकवण्यासाठी स्वत:वर झाडली गोळी
आयुष यांचे मेहुणे आदर्श यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. यामध्ये आदर्शने सांगितले, की आयुष यांचा काही जणांसोबत वाद होता. त्यामध्ये चंदन गुप्ता, मनीष जायसवाल आणि प्रदीपकुमार सिंह यांचा समावेश आहे. या सर्वांना अडकवण्यासाठीच हे षडयंत्र रचण्यात आले. यावरूनच हल्ला करवून त्यांच्याविरोधात तक्रार देण्याचा प्लॅन आयुष यांचा होता.