मायावतींनी अनेकांना ‘जागा’ दाखवली : ‘बसपा’मध्ये केले ‘मोठे’ फेरबदल

लखनऊ : वृत्तसंस्था – लोकसभा निवडणुकीत लाजीरवाणा पराभव झाल्यानंतर बसपा अध्यक्ष मायावती यांनी पक्षात मोठे बदल केले आहेत. मायावती यांनी लोकसभेच्या निवडणुकीत बसपा आणि सपा यांच्या आघाडीला फक्त दहा जागा मिळाल्या आहेत. यावर मायवती संतुष्ट नसल्याने त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

दिल्ली येथे झालेल्या पक्षातील नेत्यांच्या बैठकी आगोदर मायावती यांनी सहा राज्यातील प्रभारींना हटवले आहे. याचबरोबर तीन राज्यातील प्रदेश अध्यक्षांची देखील उचलबांगडी केली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत लाजीरवाणा पराभव झाल्यानंतर मायावतींनी ही कारवाई केली आहे. त्यांनी उत्तराखंड, बिहार, झारखंड, राजस्थान, गुजरात आणि उडीसाच्या प्रभारींना हटवले आहे. तर दिल्ली आणि मध्य प्रदेशच्या बसपा अध्यक्षांची पदावरून उचलबांगडी केली आहे.

मायावती सध्या दिल्ली दौ-यावर आहेत. काल त्यांनी राज्यांच्या प्रभारी आणि प्रदेश अध्यक्षांची बैठक बोलवली होती. या बैठकीत त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या पराभाबाबत चर्चा केली. लोकसभा निवडणुकीत बसपाला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्या. त्यामुळेच मायावती यांनी आक्रमक पवित्रा घेत राज्यांचे प्रभारी आणि अध्यक्षांची उचलबांगडी केली.

राज्यांच्या मिळालेल्या अहवालानुसार मायावती यांनी खराब कामगीरीमुळे मध्य प्रदेशचे प्रदेश अध्यक्ष छट्टू राम व दिल्लीचे प्रदेश अध्यक्ष सुरेंद्र सिंह यांना पदावरून हटवण्यात आले आहे. सुरेद्र सिंह यांच्या जागी लक्ष्मण सिंह यांची नियुक्ती केली तर मध्य प्रदेशमध्ये डीपी चौधरी यांच्या जागी रमाकांत पुत्तल यांची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली.

याबरोबरच उत्तर प्रदेश पक्षाध्यक्ष आरएस कुशावाह यांना उत्तराखंडच्या राज्य प्रभारी पदावरून हटवण्यात आले आहे. त्यांच्याजगी एमएल तोमर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उडीसा-गुजरातचे प्रभारी छट्टू राम यांना बिहार-झारखंडच्या प्रभारी बनवले आहे.

मुनकाद अली यांना राज्यस्थानच्या, माजी खासदार बलिराम यांना बिहारच्या, माजी मंत्री राजेंद्र सिंह यांना झारखंडच्या प्रभारी पदावरून हटवण्यात आले आहे. तर रामअचल राजभर यांना गुजरात बरोबरच महाराष्ट्राच्या प्रभारी पदी नियुक्त केले आहे.