खळबळजनक ! IAS अधिकाऱ्यावर पत्नीच्या खूनाचा FIR

लखनऊ : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील चिनहटमध्ये उमेश प्रताप सिंह या आयएएस अधिकाऱ्यावर पत्नीच्या हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी त्यांचे मेहुणे राजीव सिंह यांनी तक्रार दाखल केली आहे. उमेश प्रताप सिंह हे लखनऊमधील चिनहटमध्ये राज्य नगरविकास प्राधिकरणाचे संचालक आहेत.

राजीव सिंह यांनी दिलेल्या तक्रारीत आपली बहिण अनिताला मारहाण केल्याचा आरोप केला आहे. तसेच अनेक महिलांशी संबंध असल्याचा आरोप केला आहे. तसेच अनिताला गोळी लागल्यानंतर उमेश प्रताप सिंह यांनी 2 तासानंतर पोलिसांना माहिती दिली असाही त्यांनी आरोप केला आहे.

हे प्रकरण संशयास्पद मानून पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या प्रकरणातील पोस्टमॉर्टम व फॉरेन्सिक रिपोर्टनंतरच परिस्थिती स्पष्ट होईल. दरम्यान, आयएएस अधिकाऱ्याचा मुलगा आशुतोष यांनी गोळीबाराचा आवाज ऐकताच तो पहिल्या मजल्यावरील आपल्या आईच्या खोलीकडे पळाला. तेथे त्याने वडिलांना खोलीचा दरवाजा तोडताना पाहिले. यानंतर, रक्ताने भिजलेल्या आईला तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पहाटे चारच्या सुमारास कुटुंबातील सदस्यांनी पोलिसांना माहिती दिली.

दरम्यान, आयएएस अधिकारी उमेश प्रताप सिंह यांनी सांगितले की, अनिता गेल्या दोन वर्षांपासून नैराश्यात होती आणि तिच्यावर उपचार सुरू होते. घटनास्थळावरून पोलिसांनी मानसिक उपचारांसाठी औषधे, आयएएस अधिकाऱ्याची परवानाधारक पिस्तूल ताब्यात घेतले आहे. पोलिसांकडून घटनास्थळावरून कोणतीही सुसाइड नोट मिळालेली नाही .

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, अनिताने 2 वाजून 22 मिनिटांनी पतीला एक व्हाट्सएप मेसेज पाठविला होता. ज्यामध्ये तिने लिहिले आहे की, सॉरी फॉर ऑल. हा मेसेज तिने का पाठवला याचाही तपास पोलीस करत आहेत.