आंतरराष्ट्रीय हिंदू महासभेचे अध्यक्ष रंजीत बच्चन यांचा मृत्यू ‘या’ कारणामुळं झाला, पोस्टमार्टम रिपोर्ट मधून आलं समोर

लखनऊ : वृत्तसंस्था – आंतरराष्ट्रीय हिंदू महासभेचे अध्यक्ष रंजीत बच्चन यांची रविवारी सकाळी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांनतर आता रंजीत बच्चन यांचे पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आले आहे. त्यानुसार हल्लेखोरांनी बच्चन यांच्या नाकाजवळ अगदी जवळून गोळी घातली. जास्त रक्तस्त्रावामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे समजते. मिळालेल्या माहितीनुसार, अहवालात 9 एमएमच्या पिस्तूलमधून शूट केल्याचा संशय आला आहे. दरम्यान, सहसा व्यावसायिक मारेकरीच 9 मिमी पिस्तूल वापरतात. यापूर्वी आरोपींनी मुंगेरची पाॅईंट 32 बोर पिस्तुल वापरल्याचे म्हटले जात होते.

लखनऊमधील पॉश भाग असलेल्या हजरतगंजमध्ये रंजीत बच्चन हत्येची घटना घडली. लखनऊचे अतिरिक्त पोलिस आयुक्त नवीन अरोरा यांनी सांगितले की, घटनास्थळावरून रंजीत बच्चन यांचे दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. सायबर सेलची एक टीम मोबाइल फोनमधील डेटा शोधत आहे. त्याचबरोबर सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहेत.

पहिल्या पत्नीशी वाद :
या गोळीबारात जखमी झालेल्या आदित्यची पोलिस पथकाकडून विचारपूस केली जात आहे. त्यांनी सांगितले की आंतरराष्ट्रीय हिंदू महासभेचे अध्यक्ष रंजीत बच्चन यांचा गोरखपूरमध्ये पहिल्या पत्नीशी वाद झाला होता. अतिरिक्त पोलिस आयुक्त नवीन अरोरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण आठ पथके या प्रकरणाच्या तपासात गुंतली आहेत. मृत रणजित बच्चन यांच्याविरोधात गोरखपूर जिल्ह्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

चार पोलिस निलंबित :
हत्येच्या खळबळजनक घटनेनंतर लखनऊचे पोलिस आयुक्त सुजित पांडे यांनी निष्काळजीपणाच्या आरोपाखाली चार पोलिसांना निलंबित केले. चौकी प्रभारी संदीप तिवारी यांच्यासह परिवर्तन चौकात तैनात तीन पोलिसांवरही कारवाई करण्यात आली आहे.