COVID-19 : कनिका कपूर कोरोना +ve, पार्टीमध्ये बरोबर होते जतीन प्रसाद, वसुंधरा राजे आणि अनेक नामवंत व्यक्ती

लखनऊ : वृत्त संस्था – बॉलीवुड सिंगर कनिका कपूर कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर राजधानी लखनऊमध्ये खळबळ उडाली आहे. लंडनहून आल्यानंतर कनिका कपूर माजी खासदार अकबर अहमद डम्पी यांच्या डालीबाग येथील निवासस्थानी आयोजित एका हाय-प्रोफाईल पार्टीत सहभागी झाली होती. या पार्टीत 100 पेक्षा जास्त सेलिब्रिटीज सहभागी झाले होते. ज्यामध्ये अनेक राजकीय नेते, नोकरशहा आणि जज सुद्धा सहभागी झाले होते.

या पार्टीत राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे यांच्यासह त्यांचे पुत्र व खासदार दुष्यंत सिंह, काँग्रेस नेते जितिन प्रसाद, युपी सरकारचे आरोग्य मंत्री जय प्रताप सिंह यांची पत्नी व कुटुंबियांसह अनेक लोक सहभागी झाले होते.

वसुंधरा यांनी स्वत:ला केले आयसोलेट
कनिका कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे वृत्त समजताच वसुंधरा राजे यांनी स्वत:ला आयसोलेट केले आहे. तर दुष्यंत सिंह यांनी आपली कोरोना टेस्ट करून घेतली, जी निगेटीव्ह आली आहे. यासोबतच जितिन प्रसादसुद्धा आयसोलेशनमध्ये गेले आहेत. पार्टीत सहभागी सर्व लोकांना आयसोलेशनमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे वृत्त आहे.

कनिका कपूरने म्हटले – उगाचच बाऊ करण्यात येतोय
कनिका कपूरला याबाबत विचारले असता ती म्हणाली की, मी लंडनहून मुंबई आणि तेथून रस्ता मार्गाने लखनऊत आले होते. मुंबई एयरपोर्टवर माझी पूर्ण स्क्रीनिंग झाली होती. त्यानंतर मी लखनऊमध्ये पोहचले. लखनऊमध्ये माझे घर आहे. मी 13 तारखेला कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यांची फॅमिली खुप मोठी आहे, तसेच अनेक लोक सहभागी झाले होते. त्यांना कुणीही सांगितले नव्हते की, त्यांनी क्वारंटाइनमध्ये राहा. काही नसताना उगाचच या गोष्टीचा बाऊ करण्यात आला आहे.

कनिका कपूर 10 मार्चला लंडनहून परतली. यानंतर ती 15 मार्चला माजी खासदारांच्या घरी आयोजित पार्टीत सहभागी झाली होती. कनिका कपूरचे म्हणणे आहे की, जेव्हा ती परत आली तेव्हा तिला कोणतीही समस्या नव्हती. म्हणूनच ती पार्टीत गेली. दरम्यान, वृत्त आहे की, युपीचे आरोग्य मंत्रीसुद्धा आयसोलेशन वॉर्डमध्ये जाणार आहेत.

अनेक कार्यक्रमात सहभागी झाली होती कनिका
महानगर येथील शालीमार गॅलेन्टमध्ये कनिका कपूरच्या आईचे घर आहे. जेथे ती लंडनहून आल्यानंतर थांबली होती. कनिकाला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तिच्या आईचीही टेस्ट करण्यात आली, जी निगेटीव्ह आली आहे. सोबतच सर्व शेजार्‍यांचे सॅम्पलही केजीएमयूमध्ये पाठवण्यात आले आहेत. सर्वांना घरातमध्येच क्वॉरंटाईन करण्यात आले आहे.

सुमारे 400 लोकांना ती भेटली
कनिका कपूर लंडनहून आल्यानंतर अनेक कार्यक्रमात सहभागी झाली होती. एक पार्टी गुलिस्ता कॉलनीत लोकायुक्त संजय मिश्रा यांच्या घरी झाली होती. या पार्टीत ओल्ड सिंधिया बॉईज असोसिएशनच्या बॅनरखाली अनेक प्रसिद्ध व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. याशिवाय हॉटेल ताजमध्ये झालेल्या कार्यक्रमातही ती सहभागी झाली होती. तसेच कानपुरयेथील आपल्या मामाच्या घरीसुद्धा ती गेली होती. सोबतच ती लखनऊमध्ये स्कीन क्लिनिकमध्ये सुद्धा गेली होती. अंदाजानुसार सुमारे 400 लोकांना ती भेटली आहे. यादरम्यान जे लोक या पार्टीत सहभागी झाले होते किंवा तिच्या संपर्कात आले होते, त्या सर्वांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी स्वत:हून आरोग्य विभागाकडे संपर्क साधून तपासणी करून घ्यावी.