UP : आता गाडी चालवताना फोनवर बोलल्यास द्यावे लागतील 10 हजार, जाणून घ्या नवीन ट्रॅफिक नियम

लखनऊ : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेश मोटर वाहन कायद्यांतर्गत वाढलेल्या दरांचा शासन आदेश जारी करण्यात आला आहे. ज्याअंतर्गत आता गाडी चालवताना फोनवर बोलल्यास 10 हजारपर्यंत दंड आकारण्यात येईल. युपी सरकारने 16 जूनच्या कॅबिनेटच्या निर्णयाचा शासन आदेश जारी केला आहे.

माहितीनुसार, दुचाकी, चारचाकी गाडी चालवताना फोनवर बोलताना आढळल्यास पहिल्यावेळी 1 हजार दंड तर दुसर्‍यांदा आढळल्यास थेट 10 हजार रूपयांचे चलन फाडण्यात येईल. तसेच आता हेल्मेटशिवाय गाडी चालवल्यास 1000 रूपयांचा दंड आकारण्यात येईल.

सीट बेल्ट शिवाय कार चालवल्यास 1000 आणि लायसन्स नसल्यास किंवा 14 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलाने गाडी चालवल्यास 5000 रुपये दंड लावला जाईल. पार्किंगचे उल्लंघन केल्यास पहिल्यावेळी 500 रुपये आणि दुसर्‍यावेळी 1500 रुपये दंड द्यावा लागेल.

नव्या शासन आदेशानुसार आता अधिकार्‍याचे न ऐकल्यास आणि कामात अडथळा आणल्यास 2000 रुपये दंड घेतला जाईल, जो यापूर्वी 1000 रूपये होता. तसेच ड्रायव्हिंग लायसन्सबाबत चुकीची माहिती दिल्यास आता 10 हजार दंड द्यावा लागेल. तर वेग मर्यादेचे उल्लंघन करणार्‍या खासगी वाहनास 2 हजार आणि कमर्शियल वाहनास 4 हजार रुपये दंड आकारण्यात येईल. तर फायर बिग्रेड आण अ‍ॅम्ब्युलन्सला रस्ता न दिल्यास 10 हजार रूपये दंड द्यावा लागेल.