हिंदू नेते रंजीत बच्चन हत्या प्रकरणी पोलिसांनी जारी केली संशयितांची ‘छायाचित्रे’, ‘एवढ्या’ रक्कमेच्या बक्षिसाची ‘घोषणा’

लखनऊ : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशमध्ये विश्व हिंदू महासभेचे प्रदेश अध्यक्ष रंजीत बच्चन यांचा गोळ्या झाडून खून करण्यात आला. मॉर्निंग वॉकला गेले असताना त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीवरून आलेल्यांनी त्यांच्या डोक्यात गोळी झाडली. याप्रकरणातील संशयितांचे फोटो पोलिसांनी जारी केले आहेत. लखनऊ पोलिसांनी संशयितांचे फोटो प्रसिद्ध करून त्यांच्यावर बक्षीस ठेवले आहे. गुन्हेगारांची माहिती देणाऱ्यास लखनऊ पोलिसांकडून 50 हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येणार आहे. तसेच माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असे पोलिसांनी जाहीर केले आहे.

रंजीत बच्चन यांच्या खून प्रकरणातील संशयितांची माहिती देण्यासाठी लखनऊ पोलिसांनी मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी जारी केला आहे. पोलिसांनी लोकांना आवाहन केले आहे की, ज्यांना कुणाला संशयितांची माहिती असेल त्यांनी संबंधित मोबाईल क्रमांक आणि ईमेल आयडीवर माहिती पाठवावी. पोलिसांनी 9454400137 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आणि [email protected] या ईमेल आयडीवर माहिती पाठवण्याचे आवाहन केले आहे. पोलिसांनी संशयितांचे सीसीटीव्ही फुटेज जारी केले आहे.hindu-mahasabha-2_020220070253.jpg

रंजीत बच्चन यांचा अंत्यविधी करण्यात आला आहे. विश्व हिंदू महासभेने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून रंजीत बच्चन यांच्या पत्नीला 50 लाख रुपयांचे अर्थसहाय्य करण्याची मागणी केली आहे. तसेच रंजीत बच्चन यांच्या पत्नीला घर, सुरक्षा आणि नोकरी देण्याची मागणी केली आहे.

रंजीत बच्चन यांच्या पत्नी कालिंदी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, रंजीत, त्यांचा भाऊ आणि मी सकाळी मॉर्निंग वॉकला गेलो होतो. भाजप कार्यालयापर्यंत आम्ही तिघेही एकत्र होतो. त्यानंतर रंजीत आणि त्यांचा भाऊ ग्लोब पार्कच्या दिशेने गेले. साधारण साडेसातच्या सुमारास पोलिसांचा फोन आला. त्यांनी या घटनेविषयी माहिती दिली. सकाळी पोलिसांनी मला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन गेले.

कालिंदी यांनी पुढे सांगितले की, पोलिसांनी रंजीत आणि त्यांच्या कुटुंबाच्या पार्श्वभूमीची चौकशी केली. रंजीत यांना धमकीचे मेसेज आणि फोन येत होते. मात्र, त्यांनी कधीच याची कल्पना पोलिसांना दिली नाही. कमलेश तिवारी यांचा देखील अशाच पद्धतीने खून करण्यात आला होता. आमच्या लग्नाचे आमच्या समाजातील लोकांना देखील माहिती दिली नाही. ज्यावेळी आमचे लग्न झाले त्यावेळी समाजातील लोकांकडून याला विरोध झाला. तसेच खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. रणजित यांच्या खुनामागे जे कोणी लोक आहेत त्यांना तातडीने अटक करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली.