प्रियंका गांधींनी कार्यकर्त्यांना व्हॉट्सॲप नंबर ‘या’ नावाने सेव्ह करण्याचे दिले आदेश 

लखनौ : वृत्तसंस्था – काँग्रेसच्या महासचिवपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर प्रियंका गांधी यांनी कामाला सुरुवात केली आहे.  काँग्रेसच्या महासचिव आणि पूर्व उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियंका गांधी यांनी कार्यकर्त्यांचे संघटन मजबूत करण्यावर भर दिला आहे. याचाच एक भाग म्हणून त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बैठक घेऊन सर्वांना कामाचे आदेश दिले आहेत. तसेच प्रचाराची दिशा ठरवण्यासाठी कार्यकर्त्यांना एक व्हॉट्सॲप नंबर दिला असून तो नंबर ‘चौपाल’ नावाने सेव्ह करण्यास सांगितले आहे. या व्हॉट्सॲप नंबरवरच प्रियंका गांधी यांच्याकडून प्रचाराची दिशा सांगितली जाणार आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रियंका यांच्यावर पूर्वोत्तर उत्तर प्रदेशची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रियंका गांधी यांनी बुधवारी १३ लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली. बैठकीत सर्वांना व्हॉट्सॲप  नंबर दिला आहे. इतक नव्हे तर त्यांनी सर्वांना हा नंबर चौपाल या नावाने सेव्ह करण्यास सांगितले आहे.

चौपाल कार्यक्रम

अमेठी आणि रायबरेली मतदारसंघासाठी प्रियंका गांधी यांनी ‘चौपाल’ नावाचा एक कार्यक्रम सुरु केला आहे. या नंबरद्वारे येणाऱ्या कार्यक्रमाचे अपडेट दिले जाणार आहेत. तसेच महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन केले जाणार आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रियंका यांना ४१ तर ज्योतिरादित्य शिंदे यांनी ३९ जागांचे टार्गेट दिले आहे. त्यामुळेच काँग्रेसकडून चौपाल हा कार्यक्रम संपूर्ण उत्तर प्रदेशमध्ये सुरु केला जाणार आहे.