उन्नाव रेप केस : कुलदीप सेंगर प्रकरणात CBI नं तत्कालीन DM अदिति सिंहसह 2 IPS ला मानलं दोषी, कारवाईची शिफारस

लखनऊ : वृत्तसंस्था – उन्नाव बलात्कार प्रकरणाची चौकशी करणार्‍या सीबीआयने तत्कालीन डीएमसह दोन आयपीएस आणि एक पीपीएस यांना दोषी मानत यांच्याविरूद्ध कारवाई करण्याची शिफारस केली आहे. सीबीआयने ज्यांच्याविरूद्ध कारवाईची शिफारस केली आहे त्यात तत्कालीन डीएम अदिती सिंह, दोन माजी एसपी नेहा पांडे आणि पुष्पांजली सिंह यांचा समावेश आहे. याशिवाय तत्कालीन अतिरिक्त पोलिस अधीक्षक अष्टभुजा सिंह यांच्याविरूद्धही कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे. या प्रकरणात निष्काळजीपणा केल्याबद्दल सीबीआयने चारही अधिकाऱ्यांना दोषी ठरवले आहे. सीबीआयने चारही जणांवर विभागीय कारवाई करण्याची शिफारस केली आहे.

सीबीआयने युपी सरकारला पाठवला अहवाल
विशेष म्हणजे सीबीआयने बलात्काराचा दोषी असल्याचे सिद्ध झाल्यानंतर बांगरमऊचे माजी आमदार कुलदीप सिंह सेंगरला तुरुंगात पाठवले होते. यूपी सरकारला पाठवलेल्या अहवालात सीबीआयने म्हटले आहे की, प्रकरणात तत्कालीन डीएम अदिती सिंह, एसपी नेहा पांडे आणि पुष्पांजली व अतिरिक्त पोलिस अधीक्षक अष्टभुजा प्रसाद सिंह यांच्या वतीनेही या प्रकरणात दुर्लक्ष केले गेले. हे लक्षात घेता या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे.

डीएम हापूर आहेत आदिती सिंह
२४ जानेवारी ते २६ ऑक्टोबर या काळात आदिती सिंह उन्नावच्या डीएम होत्या. २ फेब्रुवारी २०१६ ते २६ ऑक्टोबर २०१७ पर्यंत नेहा पांडे एसपी होत्या. २७ ऑक्टोबर २०१७ ते ३० एप्रिल २०१८ पर्यंत पुष्पांजली सिंह एसपी होत्या. अदिती सध्या हापूरच्या डीएम आहेत. पुष्पांजली सिंह एसपी (रेल्वे गोरखपूर) आहेत. नेहा पांडे केंद्रीय प्रतिनियुक्तीवर आयबीमध्ये आहेत. अष्टभुजा सिंह पीएससी फतेहपूरमध्ये कमांडंट आहेत. या प्रकरणात माजी आमदार कुलदीप सिंह सेंगरला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच पीडित मुलीच्या वडिलांच्या हत्येप्रकरणी कुलदीपला दहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.