उत्तरप्रदेशसाठी काँग्रेसनं बनवला ‘प्रियंका प्लॅन’, सपा-बसपाला पाठीमागे टाकत 2022 मध्ये BJP ला ‘टक्कर’ देण्याची तयारी

लखनऊ : वृत्तसंस्था – पंजाबमध्ये पूर्ण बहुमत आणि महाराष्ट्रात काही प्रमाणात यश मिळाल्यानंतर आता काँग्रेसला मोठी उभारी मिळाली आहे. त्यानंतर काँग्रेसची नजर 2022 मध्ये होणाऱ्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीवर आहे. त्याच पार्श्वभूमीवर पक्षाच्या वरिष्ठ नेत्या प्रियांका गांधी आता निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या असून, उत्तर प्रदेश जिंकण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रियांका गांधी या सहारनपूरनंतर 13 फेब्रुवारीला मेरठ, 16 फेब्रुवारीला बिजनौर आणि त्यानंतर 19 फेब्रुवारीला मथुरा येथे आयोजित महापंचायतमध्ये उपस्थित राहणार आहेत. उत्तर प्रदेशमधील स्थानिक आणि एकेकाळी सत्ताधारी पक्ष असलेल्या समाजवादी पक्ष (सप) आणि बहुजन समाज पक्ष (बसप) या दोन्ही पक्षांशी टक्करही द्यावी लागणार आहे. पण प्रियांका गांधी यांच्या रुपाने पक्षाला यश मिळून नवी ऊर्जा मिळेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

उत्तर प्रदेशातील पश्चिम भागातही शेतकरी आंदोलनाचा मुद्दा
दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचा परिणाम उत्तर प्रदेशातील पश्चिम भागात पाहिला मिळत आहे. त्यानुसार काँग्रेस शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत पक्षाला बळकटी देण्याचे काम करत आहे. 2022 च्या विधानसभा निवडणुकीत सप आणि बसप यांना मागे टाकत भाजपसोबत टक्कर करण्याची योजना करत आहे.

शेतकऱ्यांच्या मनातील गोष्ट जाणून घेणार : प्रियांका गांधी
शेतकऱ्यांच्या मनातील गोष्ट ऐकणे, जाणून घेण्यासाठी, समजण्यासाठी आणि आपली भावना व्यक्त करण्यासाठी सहारनपूर येथे राहणार आहे. तसेच भाजप सरकारला काळा कृषी कायदा मागे घ्यावा लागेल, असेही प्रियांका गांधी म्हणाल्या.