हाथरस कांड : SP-DSP सह 5 पोलीस कर्मचारी ‘सस्पेन्ड’, पीडित कुटुंबियांससह सर्वांची होणार नार्को टेस्ट

लखनऊ : वृत्त संस्था – उत्तर प्रदेशातील हाथरस कांडावरून (Hathras Case) देशभरात संताप उसळल्यानंतर योगी सरकारने मोठी कारवाई केली आहे. सीएम योगी आदित्यनाथ यांनी प्राथमिक तपास अहवालाच्या आधारावर एसपी विक्रम वीर, डीएसपी राम शब्द, इन्स्पेक्टर दिनेश कुमार वर्मा, उप निरीक्षक जगवीर सिंह तसेच हेड मुर्रा महेश पाल यांना सस्पेंड केले आहे. यासोबतच आणखी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या अंतर्गत प्रकरणाशी संबंधीत पोलीस कर्मचार्‍यांसह पीडितेच्या कुटुंबियांची व अन्य काही लोकांची नार्को टेस्ट केली जाईल.

तसेच पोलीस कर्मचार्‍यांची नार्को आणि पॉलीग्राफ टेस्ट केली जाईल. तर, डीएम प्रवीण कुमार याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. या आदेशानंतर एसपी विक्रांत वीर यांच्या जागेवर एसपी शामली विनीत जयसवाल यांना हाथरसच्या नवीन एसपी नियुक्त करण्यात आले आहेत.

दोषींना अशी शिक्षा मिळेल की बनेल उदाहरण – सीएम योगी
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्या टिकेला उत्तर देतान प्रयत्न केला आहे, ज्यामध्ये युपीमध्ये महिला असुरक्षित असल्याचे म्हटले जात आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, उत्तर प्रदेशात, भगिनींचा सन्मान आणि स्वाभिमानाचे नुकसान करण्याचा विचार करणार्‍यांचा समूळ नाश केला जाईल. त्यांनी राज्यातील जनतेला विश्वास देण्याचा प्रयत्न केला आहे की, महिलांचा सन्मान आणि स्वाभिमानाला धक्का लावणार्‍यांना सोडले जाणार नाही. कोणत्याही स्थितीत त्यांना शिक्षा केली जाईल. ही शिक्षा अशी असेल जी भविष्यात एक उदाहरण बनेल.

विरोधकांचे आंदोलन जारी
यूपीत महिलांवर बलात्कार झाल्याच्या अनेक घटना या आठवड्यात समोर आल्या आहेत. विरोधकांनी या घटनेवरून सरकारवर जोरदार हल्ला केला आहे. सामान्य माणूस सुद्धा युपीच्या सुरक्षा व्यवस्थेवरून संतापला आहे. उत्तर प्रदेशच्या हाथरस कांडांनतर तर देशभरात प्रचंड संताप आहे. विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. अनेक विरोधी पक्षांनी युपी सरकारवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

गावाला पोलीस छावणीचे रूप, मीडियाला नो-एंट्री
पोलिसांनी मृत पीडितेच्या कुटुंबियांना घरात कोंडून तिच्या मृतदेहावर मध्यरात्री गुपचूप अंत्यसंस्कार केल्यानंतर तिच्या गावात प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. या गावाला पोलीस छावणीचे रूप आले आहे. जिल्ह्यात कलम 144 लागू केले असून पीडितेच्या गावाची नाकाबंदी केली आहे. गावातील लोकांना सुद्धा आयडी दाखवल्यानंतर प्रवेश दिला जात आहे. प्रशासनाच्या या दडपशाहीमुळे लोक प्रचंड संतापले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, आमच्या गावातच आम्हाला गुन्हेगारासाखे वागवले जात आहे.