स्टडी : भारत, US, ब्रिटनच्या कोरोना रुग्णांच्या फुफ्फुसांमध्ये होतेय ‘ही’ भयंकर समस्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   कोरोना व्हायरसमुळे भारत, अमेरिका आणि युरोपच्या अनेक रुग्णांमध्ये फुफ्फुसांची एक मोठी समस्या समोर येऊ लागली आहे. जर ही समस्या गंभीर असेल तर रुग्णाचा जीवसुद्धा जाऊ शकतो. कोविड रुग्णांना फुफ्फुसांच्या या संसर्गामुळे थकवा जाणवतो. श्वास घेण्यास त्रास होतो. ही समस्या भारत, अमेरिका आणि युरोपच्या अनेक रुग्णांमध्ये समोर आली आहे.

कोरोना व्हायरसमुळे होत असलेल्या या आजाराचे नाव लंग फायब्रोसिस (Lung Fibrosis) आहे. यास पल्मोनरी फायब्रोसिस (Pulmonary Fibrosis) सुद्धा म्हणतात. याबाबत एक लेख लंग इंडिया नावाच्या मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. डॉ. जरीर एफ. उदवादिया, डॉ. परवेझ ए. कौल आणि डॉ. लूका रिडेल्डी यांनी हा लेख लिहिला आहे. तिनही डॉक्टरांनी यास पोस्ट कोविड 19 इंटरस्टिशियल लंग डिसीज (PC-ILD) म्हटले आहे.

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, संपूर्ण जगात 6 कोटींपेक्षा जास्त लोकांना संसर्ग झाला आहे. यापैकी बहुतांश हलक्या किंवा मध्यम दर्जाच्या संसर्गाला तोंड देत आहेत. केवळ 10 टक्केंना गंभीर कोविड 19 निमोनिया झाला आहे. मात्र, 5 टक्के लोक असे आहेत, जे एक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम (ARDS) नवाच्या आजाराने त्रस्त आहेत. म्हणजे हेच 5 ते 10 टक्के लोक आहेत, ज्यांना लंग फायब्रोसिसची समस्या होत आहे.

लंग फायब्रोसिस आजारात फुफ्फुसांमधील ऊती म्हणजे टिश्यू सुजतात. या कारणामुळे फुफ्फुसांच्या आत हवेचे स्थान कमी होऊ लागते. परिणामी श्वास घेण्यास त्रास होतो. या कारणामुळे व्यक्तीला थकवा जाणवतो. जर स्थिती गंभीर झाली तर रुग्णाचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो किंवा हृदविकाराचा झटका येऊ शकतो.

डॉ. उदवादिया यांनी सांगितले की, आम्हाला लागोपाठ लंग फायब्रोसिसच्या केस आढळून येत आहेत. जुलै महिन्यात एम्सचे डायरेक्टर डॉ. रणदीप गुलेरिया यांनीसुद्धा म्हटले होते की, देशातील डॉक्टरांनी कोरोना रुग्णांना बरे झाल्यानंतरसुद्धा त्यांच्या अन्य अवयवांची तपासणी करून पाहिली पाहिजे की, कोरोनामुळे अन्य अवयवांना काही अडचण तर नाही ना.

डॉ. उदवादिया यांनी सांगितले की, काही रुग्णांना बरे झाल्यानंतरसुद्धा त्यांच्या घरी ऑक्सिजनची गरज भासते. रुग्ण बरा झाल्यानंतर तीन महिन्यांनी जेव्हा सीटी स्कॅन केले जाते तेव्हा त्याच्या फुफ्फुसांची स्थिती खूप खराब दिसते. तीन दशकांपूर्वी लंग फायब्रोसिस आजार सामान्यपणे खुूप कमी लोकांमध्ये होत होता. बहुतांश ज्येष्ठांमध्ये होत होता.

फुफ्फुसांच्या पेशी सुजतात. ऑक्सिजनची कमतरता जाणवते. अशावेळी रक्ताचा पुरवठा शरीरात कमी होऊ लागतो. हृदय व्यवस्थित काम करत नाही. परिणामी ऑर्गन फेल्यूअर, हार्टअटॅक किंवा इतर गंभीर अवस्थांमध्येसुद्धा मृत्यू होऊ शकतो. डॉ. उदवादिया म्हणाले, अपेक्षा आहे की बहुतांश लोक लंग फायब्रोसिसने बरे होऊ शकतात, परंतु काही लोकांमध्ये हा आजार कायम वास्तव्य करू शकते.

डॉ. उदवादिया म्हणतात, जास्त काळापर्यंत जर लंग फायब्रोसिस एखाद्या रुग्णात राहात असेल, तर त्यास श्वसन प्रणालीशी संबंधित गंभीर आजार मोठ्या कालावधीसाठी होऊ शकतात किंवा कायमस्वरूपी फुफ्फुसांच्या आजाराने व्यक्ती ग्रस्त होऊ शकते. आजाराचा उपचार तर आहे, परंतु सर्वांत मोठा उपाय आहे बचाव.

You might also like