’15 कोटींचा ठेका तुला कुणी दिला अन् तू कुणाकडे नोकरी करतोस ?’

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन – 100 कोटी हिंदूंवर 15 कोटी मुस्लिम भारी पडतील, असे चिथावणीखोर वक्तव्य एआयएमआयएमचे माजी आमदार व राष्ट्रीय प्रवक्ते वारिस पठाण यांनी केले होते. त्यांच्या या चिथावणीखोर वक्तव्यानंतर त्यांच्यावर चहुबाजूने टीकेचा भडीमार होत असून प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी वारीस पठाण यांना चांगलेच फटकारले आहे. दोन समाजात तेढ निर्माण करू शकतील अशी वक्तव्ये पठाण यांनी आपल्या भाषणात केली होती.

ज्येष्ठ पुरोगामी नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येला गुरुवारी पाच वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने कोल्हापूरमध्ये जागर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात जावेद अख्तर बोलत होते. देशातल्या 36 विद्यापीठांमध्ये सध्या खदखद सुरु आहे. भाजप ही एक शाखा असून मुख्य पक्ष आरएसएस आहे आणि स्वातंत्र्य पूर्वकाळात मुस्लिम लीग आणि आरएसएस हे इंग्रजांचे एजंट होते, असा घणाघात त्यांनी यावेळी केला. वारिस पठाण यांना त्यांच्या वक्तव्यावरून फटकारताना अख्तर म्हणले, वारिस पठाण तू कुणाकडे नोकरी करतोस ? तुम्ही 15 कोटीच राहणार. 15 कोटीचा ठेका तुला कुणी दिला ? अशा शब्दांत अख्तर यांनी पठाण यांना फटकरले. तसेच पाकिस्तान तयार होऊन जिना यांची इच्छा पूर्ण झाली. पण जिना यांची विचारसरणी आजही देशात आहे.

काय म्हणाले होते वारिस पठाण ?
मुंबईतील भायखळा येथील माजी आमदार वारिस पठाण यांचा कर्नाटकातील गुलबर्गा येथील भाषणाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या भाषणात अत्यंत प्रक्षोभक भाषा त्यांनी वापरली आहे. आता आमचा महिलावर्ग… वाघिणी बाहेर पडल्यात तर तुम्हाला घाम फुटलाय… भविष्यात आम्ही सगळेच रस्त्यावर उतरलो तर काय होईल याची कल्पना करा. आम्ही फक्त 15 कोटी पण निश्चितच 100 कोटींवर आम्ही भारी पडू, असा इशारा पठाण यांनी दिला. यावरून वादळ उठले आहे.

You might also like