तब्बल 12 हजार रुद्राक्षांपासून बनवले सिटी स्कॅन मशीनसारखे यंत्र

इंदूर : वृत्तसंस्था – एका व्यक्तीने अ‍ॅक्युप्रेशरच्या तंत्रावर कार्य करणारे नवे उपकरण बनवले आहे. या उपकरणाचे विशेष म्हणजे 12 हजारांपेक्षा अधिक रुद्राक्षांचा वापर करून हे उपकरण बनवण्यात आले आहे. मानवी शरीरासाठी हे उपकरण खूपच उपयोगी ठरणार आहे. शरीरातील टॉक्सिन्स म्हणजे विषारी द्रव्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी हे उपकरण मदत करू शकणार आहे हे विशेष. इंदूर येथील जगदीश पाटीदार यांनी हे उपकरण तयार केले आहे.
हे उपकरण सिटी स्कॅन मशिनच्या धर्तीवर तयार करण्यात आल्याचे समजत आहे. या उपकरणाला त्यांनी ‘क्रिस्टल ब्रेकर’ असे नाव दिले आहे. यामध्ये व्यक्तीला सिटी स्कॅन मशीनमध्ये झाेपवतात तसे झाेपवले जाते. यानंतर हे यंत्र गोल फिरवले जाते. यावेळी यातील रुद्राक्ष हे त्या व्यक्तीच्या शरीरातील विविध भागांना टोचतात. अ‍ॅक्युप्रेशरच्या तंत्राप्रमाणे हे काम करते. यामुळे नसांची सफाई होऊन शरीरातील टॉक्सिन्स दूर होतात अशी माहिती पाटीदार यांनी दिली आहे. या उपकरणात एकूण 12,772 रुद्राक्ष असून ते नेपाळमधून मागवले होते.
जगदीश पाटीदार हे 59 वर्षांचे असून ते फक्त आठवी पास आहेत. दैनंदिन जीवन चालवण्यासाठी पाटीदार कुलर दुरुस्त करण्याचे काम करतात. 2014 मध्ये पाटीदार यांनी असे यंत्र बनवावे असा विचार केला होता. पाटीदार यांना अनेकदा आर्थिक चणचणीचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांना 2017 मध्येच यासाठी काम करणे शक्य झाले.
सुमारे दीड वर्ष मेहनत घेतल्यानंतर त्यांना हे उकरण बनवण्यात यश आले आहे. शिवाय हे उपकरण बनवण्यासाठी त्यांना तब्बल दीड लाख रुपये खर्च आला आहे. त्यांच्या काही मित्र व परिचितांनी त्यासाठी आर्थिक मदत केली. याबाबत बोलताना पाटीदार म्हणाले की, “सध्या हे उपकरण समाजसेवेसाठी बनवले. तरीही संधी मिळाली तर व्यावसायिक हेतूने असे उपकरण बनवून त्याचे पेटंटही करू.”
You might also like